भरधाव दुचाकी घसरल्याने ज्येष्ठ नागरिक ठार... जेलरोड भागातील अपघात...

Share:
Main Image
Last updated: 07-Oct-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), ७ ऑक्टोबर २०२६

 मध्यवर्ती कारागृह परिसरात भरधाव दुचाकी अचानक घसरून झालेल्या भीषण अपघातात ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना जेलरोड भागात घडली होती.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळकृष्ण किसन दाभाडे (वय ७२, रा. ययातीनगर, पंचक सबस्टेशनजवळ, जेलरोड) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण दाभाडे हे गत २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास जेलरोड भागातून आपल्या दुचाकीवरून घराकडे जात होते. मध्यवर्ती कारागृह परिसरात त्यांची दुचाकी अचानक घसरली.

दुचाकीचा वेग जास्त असल्याने ते रस्त्यावर जोरदार आदळले आणि त्यांच्या डोक्याला तसेच शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांचे बंधू मार्तंड दाभाडे यांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने मुंबईनाका येथील 'किम्स मानवता हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी दाखल केले. गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

Advertisement

 मात्र, मंगळवारी (दि. ६) उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. निनाद थोरात यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या दुर्घटनेमुळे पंचक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार कुऱ्हाडे करत आहेत.

 
धमकी देत टोळक्याचा हल्ला

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत टोळक्याने एकावर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना सिन्नर फाटा भागात घडली.

या घटनेत ३६ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.

अमोल पगारे , चेतन पगारे, बबलू उर्फ आनंद पगारे व योगिता पगारे (रा.सर्व गोदरेजवाडी,सिन्नरफाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराची नावे आहेत.

याबाबत सागर प्रकाश कांबळे (रा.गोदरेजवाडी सिन्नरफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे सोमवारी (दि.५) सकाळच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर बसलेला असतांना ही घटना घडली.

संशयित टोळक्याने त्यास गाठून रात्री तुला जास्त माज आला होता का असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत अमोल पगारे याने कांबळे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असून त्यात ते जखमी झाले आहेत. हवालदार पवार या घटनेचा तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.