नाशिक (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर २०२६ -
शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एकतर्फी प्रेमाच्या विकृतीतून एका विवाहितेला आणि तिच्या कुटुंबाला वेठीस धरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विवाहितेचा पाठलाग करत तिच्या घरात घुसून पतीला बेदम मारहाण करणे, विवाहितेचा विनयभंग करणे आणि ऐकले नाही तर मायलेकावर थेट ॲसिड टाकण्याची धमकी देण्यापर्यंत संशयिताची मजल गेली आहे.
दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर आंधळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
दीड महिन्यांपासून सुरू होता मानसिक छळ
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित दिगंबर आंधळे हा गेल्या दीड महिन्यापासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. महिला घराबाहेर पडल्यापासून तिचा सातत्याने पाठलाग करणे, तिच्यावर पाळत ठेवणे आणि विविध मार्गांनी तिला मानसिक त्रास देणे असे प्रकार त्याने सुरू ठेवले होते. काही दिवसांपूर्वी संशयिताने थेट महिलेचे कामाचे ठिकाण गाठले. तेथे भरदिवसा तिच्यासमोर जात 'तू मला खूप आवडतेस' असे म्हणत प्रेमाची मागणी घातली.
त्यावेळी पीडित विवाहितेने अत्यंत संयम दाखवत, आपण विवाहित असून संसाराला गालबोट लावू नको, असे सांगून त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताच्या डोक्यात विकृती भरलेली असल्याने त्याने महिलेच्या समजावण्याला धुडकावून लावले.
उलट, "तू जर माझी झाली नाहीस, तर तुला इतर कोणाचीही होऊ देणार नाही," अशी उघड धमकी देत त्याने महिलेला धमकावले. बदनामी आणि भीतीपोटी सुरुवातीला पीडितेने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयिताची हिंमत दिवसेंदिवस वाढतच गेली.
थेट घरात घुसून पतीला दमदाटी आणि मारहाण
सोमवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास संशयिताच्या मुजोरीने परिसीमा गाठली. तो थेट पीडितेच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करून त्याने महिलेच्या पतीसमोर उर्मटपणे उभे ठाकत सांगितले, "तुझी बायको मला प्रचंड आवडते, त्यामुळे तू तिला विसरून जा आणि तिच्यापासून बाजूला हो." हा धक्कादायक प्रकार ऐकून संतप्त झालेल्या पतीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
यावरून वाद वाढताच संशयिताने विवाहितेच्या पतीवर हल्ला चढवत त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संशयिताने पतीसमोरच विवाहितेचा विनयभंग करत लज्जास्पद वर्तन केले.
'अपघात घडवून आणेन किंवा ॲसिड फेकेन!'
घटनेदरम्यान संशयिताने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. पतीने जर विरोध सोडला नाही आणि पत्नीने त्याच्या मागणीला मान्यता दिली नाही, तर पत्नी आणि तिच्या निष्पाप मुलाचा भीषण अपघात घडवून आणेन, अशी धमकी त्याने दिली.
इतकेच नव्हे तर मायलेकावर ॲसिड हल्ला करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू, अशी थेट धमकी संशयिताने दिली. या जीवघेण्या धमकीमुळे पीडित कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले.
म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेनंतर पीडित विवाहितेने पतीसह थेट म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संशयित दिगंबर आंधळे याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी आणि पाठलाग करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक क्षीरसागर करत असून, संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
भरवस्तीत एका कुटुंबाला घरात घुसून धमकावण्याच्या आणि ॲसिड हल्ल्याची धमकी देण्याच्या या प्रकारामुळे महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
गंगापूररोडला घरात शिरुन चोरी
उघड्या घरात शिरून चोरट्यांनी महागड्या मोबाईलसह देवघरातील चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. हा प्रकार गंगापूररोडवरील काळेनगर भागात घडला असून यात सुमारे ३ लाख ३४ हजाराच्या ऐवजावर भामट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृण्मय राजेश कुलकर्णी (रा. मायमावशी बंगलो, गुरूजी हॉस्पिटल लेन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटूंबिय २९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास आपल्या कामात व्यस्त असतांना ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चार्जींगला लावलेला ए वन प्लस कंपनीचा मोबाईल व देवघरातील चौरंगावर ठेवलेल्या चांदीच्या वस्तू असा सुमारे ३ लाख ३४ हजार २१० रूपयांचा ऐवज चोरून नेला. उपनिरीक्षक भटू पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.