नाशिक (प्रतिनिधी), ७ ऑक्टोबर २०२६ -
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अखंडित, सुरक्षित व सुलभ वित्तीय सेवा पुरवण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.
कुंभमेळा काळात होणारी अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता जिल्ह्यातील रोख (Cash) व डिजिटल बँकिंग यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) पार पडलेल्या या बैठकीस भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), केंद्रीय वित्तीय सेवा विभाग (DFS), विविध व्यावसायिक बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि नाशिकचे अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक भिवा लवाटे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कुंभमेळ्याच्या काळात नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरासाठी लागणाऱ्या आर्थिक पायाभूत सुविधांचे सविस्तर सादरीकरण केले.
६,००० कोटींची रोख मर्यादा वाढवणार
कुंभमेळा कालावधीत रोख रकमेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. नाशिकची सध्याची सुमारे ६,००० कोटी रुपयांची रोख मर्यादा वाढवून देण्याबाबत आरबीआय (RBI) बेलापूर कार्यालयाकडून सकारात्मक पावले उचलली जाणार आहेत. यामुळे बँकेच्या तिजोऱ्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवणार नाही आणि बँकिंग व्यवहार सुरळीत चालतील.
मोबाईल एटीएम आणि कॅश चेस्ट्सची क्षमता वाढणार
कुंभमेळा क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या ठिकाणी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत:
* मोबाईल एटीएम वाहने:
साधुग्राम, प्रमुख नदीघाट, तात्पुरती वाहनतळे आणि गर्दीच्या मोक्याच्या ठिकाणी फिरती (Mobile) एटीएम वाहने तैनात केली जातील.
* कॅश चेस्ट्स विस्तार:
मुख्य शहरासह कुंभमेळा परिसरात कॅश चेस्ट्सची (Cash Chests) क्षमता वाढवून रोख रकमेचा पुरवठा विनाविलंब सुरू ठेवला जाईल.
डिजिटल व्यवहार, POS अन् UPI चा दणकेबाज विस्तार
रोख व्यवहारांवरील ताण कमी करण्यासाठी आणि डिजिटल इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे:
* व्यापाऱ्यांना पीओएस (POS) मशीन:
लहान-मोठे विक्रेते, ऑटो-टॅक्सी चालक आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात पीओएस मशीन (Point of Sale Machines) उपलब्ध करून दिल्या जातील.
* क्यूआर कोड व यूपीआय (UPI):
प्रत्येक स्टॉल आणि दुकानावर सुरक्षित UPI पेमेंट सुविधा उपलब्ध असेल.
* e-KYC सुलभता:
डिजिटल पेमेंट वापरताना येणाऱ्या e-KYC आणि तांत्रिक अडचणी तातडीने सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल.
बँकिंग कॉरस्पाँडंट्सचे (BC) नेटवर्क आणि मायक्रो-क्रेडिट
कुंभमेळ्याच्या अथांग गर्दीत आणि दुर्गम भागात बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी 'बँकिंग कॉरस्पाँडंट्स' (Banking Correspondents - BCs) चे जाळे विस्तारले जाणार आहे. या प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते थेट भाविकांपर्यंत आणि लहान व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचून मायक्रो-क्रेडिट व तातडीच्या रोख रकमेच्या सुविधा पुरवू शकतील.
शुक्रवारी आरबीआयच्या पुढाकाराने अंतिम बैठक
कुंभमेळ्याच्या या सर्वसमावेशक वित्तीय आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी येत्या शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने सर्व सार्वजनिक व खाजगी बँकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात एटीएमची संख्या, मोबाईल व्हॅन्स, डिजिटल कव्हरेज आणि सुरक्षाविषयक बाबींवर अंतिम मोहर उमटवली जाईल.
"सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, पर्यटकाला आणि स्थानिक व्यापाऱ्याला सुरक्षित व सुरळीत वित्तीय सेवा मिळावी, यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि आरबीआय पूर्ण समन्वयाने काम करत आहे."
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक