नाशिक, (प्रतिनिधी) २० जानेवारी - कार खरेदी विक्री व्यवहारात बांधकाम व्यावसायीकास लाखोंना चूना लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटूंबियास दाखविण्यासाठी घेवून गेलेल्या ग्राहकाने इनोव्हा कारची परस्पर विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात १६ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ठकबाजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश पगार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. बांधकाम व्यावसायीक संदिप बारकू मांडवडे (रा.सिरीन मिरोज गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मांडवडे यांच्या मालकीची इनोव्हा क्रिष्टा कार विक्रीचा गेल्या नोव्हेंबर महिन्यात संशयिताबरोबर व्यवहार करण्यात आला होता. साडे सोळा लाख रूपयांना कार खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तत्पूर्वी संशयिताने वाहन कुटूंबियास दाखविण्याबरोबरच काही दिवस चालविण्यासाठी मागितल्याने त्याच्याकडे कार सुपूर्द करण्यात आली होती. अनेक दिवस उलटूनही संशयिताने व्यवहार पूर्ण केला नाही तसेच कारही परत केली त्यामुळे मांडवडे यांनी माहिती घेतली असता संशयिताने कार परस्पर थोरात नामक व्यक्तीस विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने मांडवडे यांनी पोलीसात धाव घेतली असून या प्रकरणाचा तपास हवालदार खेताडे करीत आहेत.
शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, घरासमोर पार्क केलेल्या अॅटोरिक्षासह दोन मोटारसायकली चोरट्यांनी वेगवगळ्या ठिकाणाहून चोरून नेल्या. याप्रकरणी अंबड व मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील सावतानगर भागात राहणारे विश्वनाथ निंबाजी ठोमरे (रा.नंदिनी किराणा दुकानाजवळ, अष्टविनायक चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ठोमरे यांची अॅटोरिक्षा गेल्या गुरूवारी (दि.१) रात्री घर परिसरातील नंदिनी किराणा दुकानासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुह्याचा तपास हवालदार देसले करीत आहेत. मोटारसायकल चोरीचा पहिला प्रकार वडाळारोड भागात घडला. शाहरूख चांद अत्तार (रा.सन डेअरी अपा. साईल लॉन्स जवळ वडाळारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अत्तार यांची मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.१७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दुसरा प्रकार दिपाली नगर भागात घडला. संदिप चंद्रभान ठेपे (रा.गामणे मळा, पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ठेपे यांची मोटारसायकल गेल्या रविवारी (दि.११) रात्री परिसरातील शर्मा मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही गुह्यांबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या असून याप्रकरणांचा तपास हवालदार डंबाळे व ठिगळे करीत आहेत.