नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर - घरासमोरील चांगला रस्ता खोदून अचानक स्पीडब्रेकर तयार करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींना परवानगीबाबत विचारपूस केल्याचा राग आल्याने, संशयितांनी घरात घुसून एका नागरिकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरात घडली आहे. या हल्ल्यात ४० वर्षीय नागरिक जखमी झाला असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात घुसून लाकडी दांडक्याने हल्ला
चिन्मय रविंद्र भागवत (वय ४०, रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, हुतात्मा अनंत कान्हेरे नगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास भागवत राहत असलेल्या परिसरात दोन अनोळखी इसम अचानक चांगला डांबरी रस्ता खोदून त्याठिकाणी स्पीडब्रेकर तयार करण्याचे काम करत होते. यावेळी भागवत यांनी तेथे जाऊन स्पीडब्रेकर बसवण्यासाठी प्रशासनाची किंवा महापालिकेची परवानगी आहे का, अशी विचारपूस केली.
विचारपूस केल्याचा राग आल्याने संशयितांनी भागवत यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून भागवत यांनी तेथून निघून आपल्या घरात जाणे पसंत केले. मात्र, तरीही संतापलेल्या दोन्ही संशयितांनी थेट भागवत यांच्या घरात घुसून त्यांना गाठले आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
संशयित पसार; पोलिसांकडून तपास सुरू
लाकडी दांडक्याच्या हल्ल्यामुळे चिन्मय भागवत हे जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर दोन्ही भामटे घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात मारहाण व बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षिरसागर करत आहेत.