नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर - शहरातील बस स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन बॅगेतून सोन्याचे दागिने व मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने मेळा बस स्टँड परिसरात सापळा रचून अटक केली. तिच्या ताब्यातून ७ लाख १२ हजार ३४४ रुपये किमतीचे ५१.७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
गर्दीत हातचलाखी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची नजर
नाशिक शहरातील विविध बस स्थानकांवर एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने व बॅगांची चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी अशा चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके बस स्थानक परिसरात गस्त घालत होती.
मेळा बस स्टँडवर रचला सापळा
सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने निर्मला लोंढे या महिलेने चोरले असून ती मेळा बस स्टँड परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती युनिट-१ मधील पोलीस अंमलदार आप्पा पानवळ व राम बर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
डॉ. अंचल मुदगल यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी मेळा बस स्टँडवर सापळा रचून संशयित महिला निर्मला विजय लोंढे (वय ४० वर्ष, रा. बालाजी नगर, टाकळीरोड, फिल्टर प्लॅन्ट जवळ, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक) हिला ताब्यात घेतले.
७ लाखांचे दागिने जप्त; गुन्ह्याची दिली कबुली
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, शहापूर ते साक्री या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरल्याची कबुली संशयित महिलेने दिली. तिच्या अंगझडतीत खालील मुद्देमाल मिळून आला:
* सोन्याचे चेन, मंगळसूत्र
* डायमंड असलेले सोन्याचे कानातले
* नऊ खडे असलेले सोन्याचे पेंडंट
* सोन्याची वेढा असलेली अंगठी
एकूण ५१.७९ ग्रॅम वजनाचे आणि ७ लाख १२ हजार ३४४ रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयित महिलेला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कामगिरी करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, दत्तात्रय पोटे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे यांच्यासह अंमलदार गोरक्ष साबळे, उत्तम पवार, महेश साळुंके, विशाल काठे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, कैलास चव्हाण, रवींद्र आढाव, मिलींदसिंग परदेशी, रमेश कोळी, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी, गणेश रूमाले, मुक्तार शेख, महिला पोलीस कर्मचारी शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, मनीषा सरोदे तसेच सुकाम पवार आणि समाधान पवार यांनी केली.