सप्तश्रृंगीगड, वणी अन् चांदवडमध्ये अशी राहणार वाहतूक व्यवस्था... नवरात्रोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 07-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑक्टोबर - आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नवरात्रोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी कुंभमेळ्याच्या धर्तीवर परस्पर समन्वयाने काम करावे, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात नवरात्रोत्सव पूर्वतयारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, कळवणच्या प्रांताधिकारी डॉ. कश्मिरा संखे, चांदवडचे प्रांताधिकारी कैलास कडलग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशमुख आणि श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सप्तश्रृंगीगड, वणी अन् चांदवडमध्ये विशेष दक्षता

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील वणी, सप्तश्रृंगीगड आणि चांदवड यांसारख्या प्रमुख देवीच्या पीठांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या काळात:

 * पर्यायी मार्ग व बॅरिकेडिंग: गर्दीच्या मुख्य जागांवर आणि sensitive पॉईंट्सवर आवश्यकतेनुसार वाहतुकीचे नियमन, बॅरिकेडिंग आणि पर्यायी मार्गांची आखणी करावी.

 * दिशादर्शक फलक: नवनवीन रस्त्यांवर, तसेच वळणांवर दिशादर्शक फलक, सूचना फलक आणि रोड सायनेजेस (Road Signages) तातडीने लावावेत.

Advertisement

 * आपत्कालीन गाड्यांसाठी मोकळा रस्ता: रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या वाहनांना गर्दीतून तातडीने रस्ता मिळेल, याची विशेष खबरदारी घ्यावी.

 * वन्यजीव संरक्षण: वन विभाग व पोलिसांनी वन्यजीवांशी संबंधित घटनांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी समन्वय ठेवावा. भाविकांनी माकडांना किंवा इतर प्राण्यांना खाद्य देवू नये, यासाठी गडावर सूचना फलक लावावेत.

शटल बस सेवा आणि पार्किंगचे नियोजन

कळवणच्या प्रांताधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी गडावरील नियोजनाची माहिती देताना सांगितले की, भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी यंदा दोन 'शटल बस' चालवण्याचे नियोजन आहे. भाविकांची गर्दी वाढल्यास नाशिक शहरातून येणाऱ्या आणि बाहेरील भागातून येणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली जाईल. तसेच गडावरील सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक त्या संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले जातील.

कुंभमेळ्याच्या धर्तीवर आंतर-विभागीय समन्वय

पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, नवरात्रोत्सवाचे नियोजन हे कुंभमेळ्याच्या धर्तीवर केले पाहिजे. कोणत्याही विभागाला काम करताना अडचण आल्यास इतर विभागांच्या वरिष्ठांशी थेट संपर्क साधून तातडीने प्रश्न सोडवावा.

प्रशासनाने सर्व प्रकारची जय्यत तयारी केली असून, भाविकांनी व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या वाहतूक सूचनांचे काटेकोर पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.