नाशिक महापालिकेत कोण होणार सभापती, उपसभापती? यांचे आले अर्ज... 'या' तारखांना होणार निवड...

Share:
Main Image
Last updated: 06-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ६ ऑक्टोबर - नाशिक महानगरपालिकेच्या पाच महत्त्वाच्या विशेष विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सत्ताधारी महायुतीत समतोल साधत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात पदांचे वाटप करण्यात आल्याचे दाखल अर्जांवरून स्पष्ट झाले आहे. नगरसचिव संजय नेरकर यांच्याकडे या सर्व जागांसाठी उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.

८ व ९ ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया

नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य, विधी तसेच शिक्षण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विभागीय आयुक्त यांच्या वतीने पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

समितीनिहाय दाखल उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे:

१. महिला व बालकल्याण समिती

सभापती: ॲड. कोमल प्रताप मेहरोलिया (भाजप)

उपसभापती: चित्रा जगन्नाथ तांदळे (भाजप)

२. शहर सुधारणा समिती

सभापती: जागृती दत्तू गांगुर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

उपसभापती: जयंत अशोक जाचक (भाजप)

Advertisement

३. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती

सभापती: डॉ. पूनम योगेश महाले (शिवसेना - शिंदे गट)

उपसभापती: सतीश आनंदराव निकम (भाजप)

४. विधी समिती

सभापती: जुई प्रणव शिंदे (भाजप)

उपसभापती: अंकिता महेंद्र शिंदे (भाजप)

५. शिक्षण समिती

सभापती: प्रा. शरद द्रौपदा चिंतामण मोरे (भाजप)

उपसभापती: सोनाली तुषार भुंदरे (भाजप)

पाच समित्यांच्या एकूण दहा पदांपैकी महिला व बालकल्याण, विधी आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या समित्यांवर भाजपने सभापती व उपसभापती अशा दोन्ही पदांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ‘शहर सुधारणा समिती’चे आणि शिवसेनेला (शिंदे गट) ‘वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती’चे सभापतीपद देण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी उपसभापतीपद भाजपने आपल्याकडे ठेवले आहे. दाखल अर्जांनुसार आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडामोडी होतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Comments

No comments yet.