नाशिक (प्रतिनिधी), ६ ऑक्टोबर २०२६ -
शहरात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका प्रकरणात छुपा कॅमेरा लावून काढलेले आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याशिवाय, एका १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेसह तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातपूर, मुंबईनाका, उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवदर्शनाचा बहाणा करून नेले, छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण अन् वर्षभर अत्याचार
पहिल्या घटनेत रक्षक संतोष भालेराव (वय २५, रा. मोरेमळा, राजराजेश्वरी जवळ, पवारवाडी, जेलरोड) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने लग्नास नकार दिल्यानंतर संशयिताने तिला मारहाण, शिवीगाळ करत फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने हिंमत दाखवून सातपूर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक निरीक्षक किरण रौदळे पुढील तपास करत आहेत.
१४ वर्षीय बालिकेचा दुचाकीस्वाराकडून विनयभंग
दुसरी घटना अशोका मार्ग परिसरात घडली. सोमवारी (दि. ५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास १४ वर्षीय मुलगी मयरीयम बंगल्यासमोरील रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी पाठलाग करत आलेल्या एका दुचाकीस्वाराने तिला गाठून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या बालिकेने घरी जाऊन पालकांना हा प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ मुंबईनाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक जितेंद्र वाघ तपास करीत आहेत.
घरात ढकलून महिलेचा विनयभंग
तिसरा प्रकार उपनगर परिसरातील सिंधी कॉलनी येथे घडला. याप्रकरणी छाया श्यामकुमार गांगुर्डे, संतोष रणनवरे आणि गौरव संतोष रणनवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित छाया गांगुर्डे हिच्या सांगण्यावरून बाप-लेकाने पीडितेला आधी शिवीगाळ केली होती. त्यानंतर रविवारी (दि. ४) दुपारी पीडिता घराबाहेर वाळत टाकलेले कपडे काढत असताना संशयित गौरव रणनवरे याने तिला घरात ढकलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलीस जमादार बकाल तपास करत आहेत.
घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या मुलाला मारहाण
चौथी घटना गोरेवाडी परिसरात घडली. गुरुवारी (दि. १) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पीडित विवाहिता घरात एकटी असताना सचिन जगताप, किरण निकम आणि बारक्या निकम हे घरात शिरले. ‘तुझा मुलगा कुठे आहे?’ अशी विचारणा करत त्यांनी विवाहितेचा विनयभंग केला. हा प्रकार समजल्यानंतर मुलाने गोरेवाडी रिक्षास्टँडवर जाऊन संशयितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार झाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.