५० लाख संशयास्पद सिम कार्ड बंद... चोरीचे १४ लाख मोबाईल शोधण्यात यश...

Share:
Main Image
Last updated: 06-Oct-2026

 

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ६ ऑक्टोबर - दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित वाढत्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी देशातील नागरिक आता सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंवाद विभागाने (DoT) सुरू केलेल्या 'संचार साथी' (www.sancharsaathi.gov.in) या पोर्टलला आतापर्यंत ३० कोटींहून अधिक वेळा भेट देण्यात आली आहे. या पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे देशात ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची संभाव्य आर्थिक फसवणूक रोखण्यात मोठे यश आले आहे.

मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामुळे प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याच्या हाती फसवणुकीविरुद्ध लढा देण्याचे एक सशक्त साधन उपलब्ध झाले आहे. संशयास्पद कॉल्स, संदेशांची तक्रार करणे असो की हरवलेला फोन ब्लॉक करणे, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे आज प्रत्येक नागरिक एक 'सायबर योद्धा' म्हणून समोर येत असल्याचे प्रतिपादन दूरसंवाद विभागाने केले आहे.

'संचार साथी' पोर्टलद्वारे मिळालेले मोठे यश:

 * ३० कोटींहून अधिक भेटी: नागरिकांनी या पोर्टलवर दाखवलेला प्रचंड विश्वास आणि वाढती जागरूकता.

 * १४ लाखांहून अधिक मोबाईल हस्तगत: आतापर्यंत ६०.९६ लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल हँडसेट्स ब्लॉक करण्यात आले, ३७.८५ लाखांचा शोध घेण्यात आला, तर १४ लाखांहून अधिक हँडसेट नागरिकांना सुरक्षितपणे परत मिळाले.

 * ४ कोटींहून अधिक तक्रारींचे निवारण: आपल्या नावावर किती मोबाईल जोडण्या (Sim Connections) सुरू आहेत, हे तपासण्यासाठी आलेल्या ४ कोटींहून अधिक अर्जांवर यशस्वी कारवाई करण्यात आली.

 * ५० लाख मोबाईल कनेक्शन बंद: संशयास्पद कॉल्स व संदेशांच्या तक्रारींवर कारवाई करत ५० लाखांपेक्षा जास्त बनावट किंवा गैरवापर होणारे मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले.

 * ५,००० कोटी रुपयांची बचत: आर्थिक फसवणूक धोका निर्देशक यंत्रणा (Financial Fraud Risk Indicator) व डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने नागरिकांचे हजारो कोटी रुपये सायबर भामट्यांच्या हाती जाण्यापासून वाचवण्यात आले.

नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या प्रमुख सेवा:

Advertisement

१. चक्षू (Chakshu): बनावट केवायसी, बँक/पोलिस अधिकारी असल्याचा बनाव, नोकरी किंवा कर्जाच्या फसव्या ऑफर्स आणि स्पॅम कॉल्स/व्हॉट्सॲप मेसेजची तत्काळ तक्रार करण्याची सुविधा.

२. नावावरील मोबाईल जोडण्या तपासणे: स्वतःच्या नावावर चालू असलेले सर्व सिम कार्ड तपासून न वापरलेले किंवा अनोळखी क्रमांक बंद करण्याची विनंती करणे.

३. हरवलेला फोन ब्लॉक करणे: चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन देशभर ब्लॉक करणे व सापडल्यावर अनब्लॉक करणे.

४. आयएमईआय (IMEI) पडताळणी: नवीन अथवा जुना मोबाईल खरेदी करण्यापूर्वी तो अस्सल आहे की बनावट, हे तपासणे.

५. आंतरराष्ट्रीय बनावट कॉल्सची तक्रार: परदेशातून भारतीय (+91) क्रमांकाच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद कॉल्सची नोंद करणे.

२२ भाषांमध्ये 'संचार साथी' ॲप उपलब्ध

सामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी संचार साथी हे मोबाईल ॲप इंग्रजी, हिंदीसह २१ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) दोन्ही मंचांवर हे ॲप डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.

दूरसंवाद विभागाचे नागरिकांना आवाहन:

दूरसंवाद विभागाने सर्व मोबाईल वापरकर्त्यांना आपल्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत हे तपासण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद मेसेजची 'चक्षू'वर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. जर आधीच आर्थिक फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

 

Comments

No comments yet.