आठ तास वीज कुठे जाते? स्मार्ट मीटरची बिले इतकी का वाढतात? आमदार महावितरणवर भडकले...

Share:
Main Image
Last updated: 05-Oct-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ५ ऑक्टोबर - "दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पाणी, चारा, वीज, शेती आणि रोजगाराचे अत्यंत काटेकोर नियोजन करावे. संकटात सापडलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणे, टोलवाटोलवी किंवा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. तालुका व जिल्हास्तरावर सुटणारे प्रश्न तातडीने निकाली काढा; तर राज्यस्तरावरील प्रश्न माझ्याकडे पाठवा, त्यांचा पाठपुरावा मी स्वतः करेन," असे स्पष्ट व कडक निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या अडीच तास चाललेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

महावितरणच्या कारभारावर आमदार किशोर पाटील आक्रमक

बैठकीदरम्यान महावितरणच्या अनागोंदी कारभारावरून वातावरण चांगलेच तापले. आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत धारेवर धरले.

"जिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या चार-पाच वर्षांत ट्रान्सफॉर्मर आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही शेतकऱ्यांना आठ तास सलग वीज का मिळत नाही? आठ तास वीज कुठे जाते? आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिले इतकी अवाजवी का वाढतात?" असा थेट सवाल आमदार पाटील यांनी केला. अनेक भागांत ३-४ ताससुद्धा नियमित वीज मिळत नसल्याचे सांगत त्यांनी ट्रान्सफॉर्मर जळणे आणि कमी दाबाचा पुरवठा यावर तीव्र संताप व्यक्त केला.

यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. "दुष्काळात शेतकरी संकटात असताना केवळ तांत्रिक नियम सांगून त्याला फिरवू नका. माणूस म्हणून त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि सर्व तक्रारी विनाविलंब सोडवा," असे त्यांनी बजावले.

पाणी, चारा आणि पीककर्जाचे चोख नियोजन

Advertisement

पालकमंत्री म्हणाले की, दुष्काळाच्या काळात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम केले पाहिजे:

पिण्याचे पाणी व चारा: पिण्याच्या पाण्याचे गावनिहाय सूक्ष्म नियोजन तयार ठेवावे. धरण परिसरातून होणारा अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. तसेच चारा टंचाई भासू नये म्हणून कृषी व पशुसंवर्धन विभागाने आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात.

पीककर्ज वाटप: राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज वाटपात होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सर्व पात्र प्रकरणे तातडीने मंजूर करण्याचे आदेश दिले. यावर पुढील १५ दिवसांत पुन्हा आढावा घेतला जाईल.

स्थानिक विकासकामं अन् भाविकांच्या सुविधांचे निर्देश

बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे व मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावर हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

तसेच, कनाशी येथील श्री कृष्ण दत्त मंदिराच्या (महानुभाव पंथ) सुमारे ४० दिवस चालणाऱ्या भव्य उत्सवासाठी देशभरातून येणाऱ्या लाखोंच्या संख्येने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व वाहतुकीचे चोख नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच घरकुल योजना, भूमी अभिलेख विभागाकडील प्रलंबित मोजणी आणि पाचोरा-तारखेडा रस्त्याचे भूसंपादन यांसारखे विषय तातडीने सोडवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले.

प्रमुख उपस्थितांची नोंद

या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, सभापती गणेश पाटील, माजी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दीपक पाटील, अरुण पाटील, शेतकरी सेनेचे सुनील पाटील, युवराज पाटील, पद्मसिंग पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.