नाशिक, (प्रतिनिधी) ५ ऑक्टोबर - नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीला (MIDC) लागून असलेल्या दत्तनगर व चुंचाळे परिसरात एका भीषण पर्यावरणीय व आरोग्य आणीबाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील नागरिकांच्या घरगुती बोअरवेलमधून अचानक तीव्र दर्प असलेले आणि गडद पिवळ्या रंगाचे विषारी रासायनिक पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. काही बेजबाबदार आणि नफेखोर कारखान्यांनी घातक रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट जमिनीत सोडल्यामुळे हे विषारी पाणी भूजलात पाझरल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. हे विष केवळ भूजलापुरते मर्यादित न राहता नंदिनी (नासर्डी) नदीमार्गे गोदावरीत मिसळत असल्याने, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील लाखो भाविकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यावरण कार्यकर्ते राजेश पंडित, प्रवीण शिलावट आणि रोशन केदार यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अंबड एम.आय.डी.सी.लगतच्या दत्तनगर भागात नागरिकांनी दैनंदिन वापरासाठी खोदलेल्या बोअरवेलमधून अचानक उग्र वासाचे, फेसाळलेले आणि पिवळसर रंगाचे पाणी बाहेर पडू लागले आहे. स्थानिक महिला आणि रहिवाशांनी बाटल्या व बादल्यांमध्ये भरून ठेवलेले हे पाणी पाहताच डोळे विस्फारतील अशी स्थिती आहे. प्राथमिक पाहणीनुसार, काही रासायनिक उद्योगांनी लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी घातक केमिकल थेट जमिनीत ‘रिव्हर्स बोअरिंग’ करून किंवा नाल्यांमध्ये बेकायदेशीरपणे मुरवल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना त्वचाविकार, उलट्या, मळमळ आणि पोटाच्या गंभीर विकारांचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा धोक्यात!
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार असून देशभरातून कोट्यवधी भाविक आणि साधू-संत या ठिकाणी दाखल होणार आहेत. नंदिनी आणि गोदावरी नदीच्या पवित्र संगमावर (संगम घाट) लाखो भाविक श्रद्धेने पवित्र स्नान करतात. जर अंबड एमआयडीसीमधील हे रासायनिक सांडपाणी भूजलातून आणि नाल्यांतून असेच पाझरत राहिले, तर पवित्र संगमाचे पाणी विषमय होईल. हे सांडपाणी थेट भाविकांच्या आरोग्याशी खेळणारे ठरेल, तसेच नाशिकच्या आणि कुंभपर्वाच्या पवित्रतेला मोठा तडा जाईल. हे प्रकरण केवळ स्थानिक राहिले नसून मानवनिर्मित राष्ट्रीय आपत्तीचे स्वरूप धारण करत आहे.
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
प्रशासनाने तातडीने हालचाल करून संकट टाळावे, यासाठी खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
१. बोअरवेल तातडीने सील करा: बाधित परिसराचे सखोल तांत्रिक सर्वेक्षण करून भूजल शुद्ध होईपर्यंत परिसरातील सर्व बोअरवेल त्वरित सील करण्यात याव्यात, जेणेकरून अनावधानाने या पाण्याचा वापर होणार नाही.
२. घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी: महापालिकेच्या आरोग्य विभागाने दत्तनगरमध्ये 'डोअर-टू-डोअर' सर्व्हे करून लहान मुले, महिला व नागरिकांची तपासणी करावी आणि बाधितांवर मोफत उपचार करावेत.
३. नदीपात्राची रासायनिक तपासणी: प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बोअरवेलच्या पाण्यासोबतच नंदिनी नदी व गोदावरी संगमावरील पाण्याचे नमुने युद्धपातळीवर तपासून केमिकलचा नेमका उगम शोधावा.
४. दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करा: पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून नाशिकचे जलस्रोत उद्ध्वस्त करणाऱ्या कारखान्यांचे परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्या मालकांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
५. टँकरद्वारे पिण्याचे पाणी: जोपर्यंत भूजल दूषित आहे, तोपर्यंत महापालिकेने दत्त नगरमधील नागरिकांना दैनंदिन वापरासाठी व पिण्यासाठी मुबलक टँकरद्वारे स्वच्छ पाणी पुरवावे.
गोदावरी नदीचे अस्तित्व आणि कोट्यवधी भाविकांचे आरोग्य पणाला लागले असल्याने आता शासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ या नफेखोर रासायनिक कंपन्यांवर काय बुलडोझर कारवाई करणार, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे