नाशिक (प्रतिनिधी), ५ ऑक्टोबर २०२६ -
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी आणि खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. एका माजी विद्यार्थ्याने आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एवढेच नव्हे तर बदनामीची धमकी देत तब्बल पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी, खंडणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (आयटी अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन राजाराम आढे-राठोड (रा. अंबड, जि. जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
ओळखीचा गैरफायदा घेत विणले जाळे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चेतन राठोड हा नाशिक शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्या काळात त्याचे त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापिकेशी परिचय झाला. पुढे संबंधित प्राध्यापिकेची अन्यत्र बदली झाल्यानंतरही चेतनने त्यांच्याशी जाणीवपूर्वक संपर्क ठेवून ओळख वाढवली.
हळूहळू विश्वासात घेऊन त्याने त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या काळात त्याने प्राध्यापिकेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची सर्व माहिती गोळा केली आणि त्यांच्या कौटुंबिक अडचणी व असहाय्यतेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली.
साडेचार वर्षे ब्लॅकमेलिंगचा खेळ
सन २०२१ पासून हा प्रकार सुरू होता. या साडेचार वर्षांच्या काळात चेतनने प्राध्यापिकेचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ मिळवले. वारंवार व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगच्या माध्यमातून तो त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत राहिला.
दरम्यान, संशयिताने पीडितेला राज्याबाहेर फिरायला येण्यासाठी सातत्याने गळ घातली. मात्र प्राध्यापिकेने त्याच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला. या नकाराने संशयिताचे खरे रूप समोर आले.
कुटुंबियांना संपर्क आणि जातीवाचक शिवीगाळ
पीडितेने नकार दिल्याने संतप्त झालेल्या चेतनने थेट पीडितेच्या बहिणीशी आणि वहिनीशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. "माझ्याकडे तिच्याबद्दलची सर्व माहिती आणि पुरावे आहेत, मी सांगेन तसेच तिला वागायला सांगा," अशी धमकी त्याने कुटुंबियांना दिली.
हा प्रकार समजताच प्राध्यापिकेने त्याला जाब विचारला असता, संशयिताने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. तसेच फोटो-व्हिडिओ व्हायरल करून समाजात बदनामी न करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची थेट मागणी केली.
सततचा मानसिक छळ आणि कुटुंबियांच्या बदनामीची भीती वाढल्याने अखेर पीडित प्राध्यापिकेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी चेतन राठोडविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी), खंडणी आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे.