नाशिक, (प्रतिनिधी) २० जानेवारी - शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी नाशिकमधील काही प्रमुख मार्गांवर १९ एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. टिळकवाडी सिग्नलपासून जलतरण तलावापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने, हा मार्ग पुढील तीन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे कॅनडा कॉर्नर आणि शरणपूर रोड परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणते मार्ग राहतील बंद?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरणपूर पोलीस चौकी ते जुना गंगापूर नाका सिग्नलपर्यंतचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच महापौरांच्या शासकीय निवासस्थानासमोरील रस्तादेखील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वर्षभरासाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
कुठून असेल पर्यायी मार्ग?
वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत:
१. शरणपूर पोलीस चौकीकडून जुन्या गंगापूर नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांनी आता एबीबी सिग्नल - महात्मानगर - जेहान सर्कल मार्गे प्रवास करावा.
२. टिळकवाडी भागातील वाहतूक स्थानिक गल्ली-बोळांतून वळवण्यात आली आहे.
कडक नियमावली लागू
रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक सूचना देण्यात आल्या आहेत. कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणे, रिफ्लेक्टर बसवणे, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना करणे आणि ठिकठिकाणी सूचना फलक लावणे ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता
हे महत्त्वाचे रस्ते बंद झाल्यामुळे कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, जुना गंगापूर नाका, टिळकवाडी आणि मायको सर्कल या परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.