ऑनलाइन डेस्क, (नवी दिल्ली) ५ ऑक्टोबर - विमा पॉलिसीच्या सव्वा कोटी रुपयांवर डोळा ठेवून पतीनेच ५ महिन्यांच्या गरोदर पत्नीची सुपारी देऊन निर्घृण हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ सप्टेंबर रोजी रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळलेल्या कविता चौधरी (वय ३०) हिचा मृत्यू सुरुवातीला अपघात वाटत होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल (Post-Mortem) आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासातून या हत्येमागचा काळजाचा ठोका चुकवणारा कट उघडकीस आला आहे.
अपघाताचा बनाव अन् शवविच्छेदन अहवालाने फिरवली चक्रे
४ सप्टेंबरच्या रात्री जबलपूर परिसरातील रस्त्याच्या कडेला कविता चौधरी हिचा मृतदेह तिच्या स्कूटीसह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात ती ५ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आणि तिच्या डोक्यावर झालेल्या जखमा सामान्य अपघाताच्या नसून घडवून आणलेल्या धडकेच्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कॉल डेटा रेकॉर्ड्स (CDR) आणि परिसरातील तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला, ज्यातून हत्येचा पर्दाफाश झाला.
असा रचला हत्येचा कट
या भीषण हत्येचा मुख्य सूत्रधार मृत महिलेचा पती प्रयास पांडे हाच निघाला. प्रयास न्यायालयात नोटरी आणि स्टॅम्प व्हेंडर म्हणून काम करतो. त्याने त्याचा साथीदार मानसिंग लोधी याच्या मदतीने हा कट रचला होता. पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून हत्या करण्याच्या एका महिन्यापूर्वीच विक्रम अहिरवार नावाच्या चालकाच्या नावावर एक पिकअप वाहन भाड्याने घेण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी प्रयासने पत्नी कविताला एका कामाच्या बहाण्याने त्या निर्जन मार्गावर पाठवले. तिथे आधीच घात लावून बसलेल्या तीन मारेकऱ्यांनी तिच्या स्कूटीला पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली आणि गाडी थेट तिच्या डोक्यावरून घालवून तिचा जागीच निघृण खून केला.
१.१५ कोटींच्या विम्याचा हाव अन् आंतरजातीय विवाह
पोलीस तपासादरम्यान हत्येमागचे खरे कारण समोर आले ते म्हणजे १.१५ कोटी रुपयांचा अपघाती विमा क्लेम (Insurance Claim). कायद्याचे ज्ञान असल्याने प्रयासला ठाऊक होते की अपघाती मृत्यू दाखवल्यास विम्याची मोठी रक्कम सहजरीत्या मिळेल.
या कामासाठी त्याने मारेकऱ्यांना ६० ते ७० हजार रुपये आधीच दिले होते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर २०२४ मध्येच प्रयास आणि कविता यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी त्याने पोटच्या बाळासह पत्नीचा बळी घेतला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.