मुंबई, (प्रतिनिधी) ४ ऑक्टोबर - राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) उपकंपनी असलेल्या 'नॅबकिसान फायनान्स लिमिटेड' ने १ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतातील पहिल्या ‘वॉश’ (WASH - Water, Sanitation and Hygiene) आधारित सामाजिक रोख्यांची (Social Bonds) मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) अधिकृत नोंदणी केली. केवळ पाणी, स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्राला समर्पित असलेल्या या रोख्यांना भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून ₹१८० कोटींचा निधी संकलित करण्यात नॅबकिसानला यश आले आहे.
या रोख्यांच्या यशस्वी नोंदणीनंतर एनएसई (NSE) येथे नाबार्ड, नॅबकिसान, वॉटर डॉट ओआरजी आणि ट्रस्ट ग्रुपच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पारंपरिक घंटा वाजवून नोंदणी सोहळा पार पडला.
‘वॉश’ (WASH) सामाजिक रोख्यांची प्रमुख वैशिष्ट्ये:
* एकूण संकलित निधी: मागणीपेक्षा १.८ पट अधिक प्रतिसाद मिळून ₹१८० कोटी जमा.
* मुदत (Tenure): ५ वर्षे (सप्टेंबर २०३१ पर्यंत).
* व्याजदर (Coupon Rate): ८.१०% वार्षिक.
* पतमानांकन (Credit Rating): क्रिसिल (CRISIL AAA / Stable) आणि केअर (CARE AAA / Stable) कडून सर्वोच्च रेटिंग प्राप्त.
* तांत्रिक भागीदार: या उपक्रमात 'वॉटर डॉट ओआरजी' (Water.org) यांनी तांत्रिक सल्लागार व माहिती भागीदार म्हणून योगदान दिले आहे.
निधीचा वापर आणि सामाजिक परिणाम
या रोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ₹१८० कोटींच्या निधीचा वापर प्रामुख्याने ग्रामीण आणि वंचित घटकांसाठी केला जाणार आहे:
१. सुरक्षित पिण्याचे पाणी: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे.
२. स्वच्छता सुविधा: शौचालये व सांडपाणी व्यवस्थापनासाठी वित्तपुरवठा करणे.
३. आरोग्य व राहणीमान सुधारणा: शुद्ध पाणी आणि स्वच्छतेमुळे आजारांचे प्रमाण कमी होऊन ग्रामीण नागरिकांचे आरोग्य, उपजीविका आणि राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे.
प्रमुख मान्यवरांचे वक्तव्य
"पाणी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत विकास घटकांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याची क्षमता या 'वॉश' रोख्यांच्या यशाने सिद्ध केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला मोठा हातभार लागेल."
— डॉ. शाजी कृष्णन व्ही. (अध्यक्ष, नाबार्ड)
"भांडवली बाजारातील वित्तीय साधने सामाजिक विकासासाठी कशी वापरता येऊ शकतात, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद हा शाश्वत ग्रामीण वित्नावरील वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे."
— इमॅन्युएल गणेशन (व्यवस्थापकीय संचालक व सीईओ, नॅबकिसान)
भारतातील या पहिल्या वॉश-आधारित सोशल बाँडच्या यशाने नाबार्ड आणि नॅबकिसानची नावीन्यपूर्ण वित्तीय पर्यायांप्रती असलेली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. यामुळे देशातील शाश्वत आणि सामाजिक वित्तीय बाजाराला (Sustainable Finance Market) नवी दिशा मिळणार आहे.