त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) ४ ऑक्टोबर - पितृपक्षाच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आणि पितृकर्माच्या विधींसाठी देशभरातून भाविकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यातच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात अचानक अभूतपूर्व गर्दी झाली आहे. या वाढत्या गर्दीचे नियोजन करताना प्रशासनाची मोठी कसरत होत असून, सर्वसामान्य भाविकांना तासनतास रांगेत ताटकळावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दि. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
विश्वस्त मंडळाचा निर्णय आणि अपवाद
देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, केवळ केंद्र शासन, राज्य शासन अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या अधिकृत राज्यशिष्टाचारासंबंधीच्या (Protocol) लेखी पत्रव्यवहारानुसार असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच यातून अपवाद ठेवण्यात आले आहे. इतर सर्व प्रकारच्या व्हीआयपी, विशेष दर्शन पास आणि शिफारसींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्वसामान्य भाविकांना सहजरीत्या आणि कमी वेळेत दर्शन मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अंमलबजावणीवर जाणकारांचे प्रश्नचिन्ह
दरम्यान, देवस्थानच्या या निर्णयावर स्थानिकांमधून आणि अभ्यासू नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "अशा प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंदीचे निर्णय दरवर्षी किंवा गर्दीच्या काळात कागदावर घेतले जातात; मात्र प्रत्यक्षात त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही," असा थेट आरोप जाणकार आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. पडद्यामागून किंवा छुप्या मार्गाने व्हीआयपी दर्शन सुरूच राहते आणि सामान्य भाविकांच्या पदरी मात्र निराशाच पडते, अशी टीकाही केली जात आहे.
त्यामुळे यंदा तरी देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन या निर्णयाची १००% कठोर अंमलबजावणी करून सामान्य भाविकांना खरोखरच दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.