नाशिक, (प्रतिनिधी) ४ ऑक्टोबर - वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साईनाथ साळुंके यांच्यावर नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी राहुल साळुंके फरार झाला आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. या खळबळजनक घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संस्थानच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
अध्यक्षांवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि मीडिया तसेच सोशल मीडियावर संस्थानच्या नावाने सुरू असलेल्या बदनामीमुळे संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त मंडळ आक्रमक झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थानची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची विशेष बैठक अमर मारुती ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस संस्थानचे सचिव श्रीपाद कुलकर्णी, माजी अध्यक्ष निलेश गाढवे, माजी अध्यक्षा ह.भ.प. कांचनताई जगताप, माजी अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, तसेच विश्वस्त नारायण मुठाळ, गोकुळ गांगुर्डे, जयंत गोसावी, अनिल गोसावी आणि योगेश गोसावी हे उपस्थित होते.
बैठकीत राहुल साळुंके यांच्यावरील गंभीर गुन्ह्याबाबत आणि त्यामुळे संस्थानच्या प्रतिमेला पोहोचणाऱ्या धक्क्यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व विश्वस्तांनी एकमुखाने निर्णय घेत राहुल साईनाथ साळुंके यांची संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्षपदावरून तातडीने हकालपट्टी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.
संस्थानचा प्रकरणाशी कोणताही संबंध नाही: विश्वस्त मंडळाचे स्पष्टीकरण
विश्वस्त मंडळाने या बैठकीनंतर अधिकृत पत्रक काढून जनतेला व प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे. "सदर लैंगिक शोषणाचे प्रकरण हे राहुल साळुंके यांचे पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. या प्रकरणाशी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर किंवा इतर कोणत्याही विश्वस्तांचा कोणताही दूरान्वये संबंध नाही," असे स्पष्टीकरण विश्वस्त मंडळाने दिले आहे.
तसेच, राहुल साळुंके यांच्या वैयक्तिक कृत्यामुळे पवित्र समाधी संस्थानची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे, न्यूज चॅनेल्स आणि बातमीदार यांनी या प्रकरणाचे वृत्त देताना किंवा सोशल मीडियावर मेसेज प्रसिद्ध करताना संस्थानचे किंवा इतर निर्दोष विश्वस्तांचे नाव जोडून बदनामी करू नये, अशी नम्र विनंती सर्व समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
फरार अध्यक्षाचा पोलीस शोध घेत आहेत
दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच राहुल साळुंके हा पसार झाला असून पोलीस पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. एका पवित्र धार्मिक पिठाच्या अध्यक्षावरच असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणी अधिक तपास करत असून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.