ऑनलाइन डेस्क, (नवी दिल्ली) ४ ऑक्टोबर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (NH-48) वरील करजण (वडोदरा) परिसरात असलेल्या एका सीएनजी पंपावर गुरुवारी (१ ऑक्टोबर) सीएनजी भरत असताना अचानक कारमधील सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा स्फोट इतका तीव्र होता की कारचे अक्षरशः तुकडे झाले असून, स्फोटाचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी एका सीएनजी पंपावर कारमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. गॅस भरत असतानाच अचानक कारमधील सीएनजी टाकीचा (सिलिंडर) मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे कारच्या मागच्या भागाचे आणि काचांचे तुकडे दूरवर उडून गेले.
सहाजीकच, गॅस भरताना नियमांनुसार कारमधील प्रवाशांना बाहेर उतरवण्यात आले होते. गाडीत कोणीही उपस्थित नसल्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, स्फोटाच्या प्रचंड धक्क्याने शेजारी उभ्या असलेल्या अन्य दोन वाहनांचेही किरकोळ नुकसान झाले आहे.
पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच करजण नगरपालिकेची अग्निशामक टीम आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरक्षा म्हणून परिसर निर्मनुष्य केला व आवश्यक उपाययोजना केल्या.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीएनजी गाड्यांमध्ये बेकायदेशीर किंवा निकृष्ट दर्जाचे सिलिंडर बसवणे आणि त्यांची वेळेवर तपासणी न करणे, यामुळे अशा घटना घडत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीएनजी भरताना गाडीतून बाहेर पडण्याच्या नियमाचे तंतोतंत पालन केल्यामुळेच आज अनेक जीवांचे रक्षण झाले, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.