एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये मध्यरात्री थरार... कोयता-रॉडचा धाक दाखवून...

Share:
Main Image
Last updated: 03-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एन. डी. पटेल रोडवरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय वर्कशॉपमध्ये मध्यरात्री धारदार कोयता व लोखंडी रॉडचा धाक दाखवत चोरी करण्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांच्या टोळक्याने कर्मचाऱ्यांवर दगडफेक करत तेथून धूम ठोकली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री भिंतीवरून उड्या मारून प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन. डी. पटेल रोडवरील एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये गुरुवारी (दि. १) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चार संशयित तरुणांचे टोळके चोरी करण्याच्या उद्देशाने वर्कशॉपच्या सुरक्षा भिंतीवरून उड्या मारून आत शिरले. मध्यरात्रीच्या सुमारास वर्कशॉपमधील ट्रान्सफार्मर रूमजवळ काहीतरी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे कर्तव्यावर असलेले आगार व्यवस्थापक अमेय श्रावणे आणि सुपरवायझर अंकुश चिखले यांच्या निदर्शनास आले.

कोयत्याचा धाक अन् दगडफेक

Advertisement

काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच आगार व्यवस्थापक श्रावणे आणि चिखले यांनी तात्काळ ट्रान्सफार्मर रूमच्या दिशेने धाव घेतली. तिथे चार जण साहित्याची चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. पकडले जाण्याच्या भीतीने संशयितांपैकी एकाने हातातील धारदार कोयता आणि दुसऱ्याने लोखंडी रॉड उगारून कर्मचाऱ्यांना जागेवरच ठार मारण्याची धमकी दिली, तर उर्वरित दोघांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली.

एकमेकांना मारलेल्या हाकांमुळे नावे उघड

कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत धैर्याने प्रतिकार सुरूच ठेवल्याने संशयित घाबरले. पळून जाण्याच्या गडबडीत ते एकमेकांना "भूषण, राहिल पळा..." अशा हाका मारत होते. त्यामुळे त्यांच्यातील भूषण आणि राहिल या दोघांची नावे समोर आली. कर्मचाऱ्यांना धमकावत आणि दगडफेक करत हे चौघेही पुन्हा संरक्षक भिंतीवरून उड्या मारून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वर्कशॉपमधील शासकीय मालमत्तेची मोठी चोरी टळली.

भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी आगार व्यवस्थापक अमेय श्रावणे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भूषण, राहिल आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध प्राणघातक हत्यारांचा धाक दाखवणे, चोरीचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या टोळक्याचा शोध सुरू आहे.

 

Comments

No comments yet.