या सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता... नाशिक एसीबीची मोठी कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 03-Oct-2026

 

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - बडतर्फ वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी पहाटे दिलीप खेडकर यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानासह विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईदरम्यान खेडकर कुटुंबाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल १०२ टक्के अधिक, म्हणजेच १३ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी नाशिक आणि अहिल्यानगर 'एसीबी'च्या पथकाने दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

१० ठिकाणी एकाच वेळी सर्च ऑपरेशन

नाशिक 'एसीबी'च्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे दिलीप खेडकर यांच्या निवासस्थानी धडक दिली. खेडकर यांच्याशी संबंधित एकूण १० वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी हे 'सर्च ऑपरेशन' राबवण्यात आले. या कारवाईत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घरातील मालमत्तेची कागदपत्रे, बँक पासबुक्स, मुदत ठेव पावती (FDs) आणि इतर आर्थिक व्यवहारांची नोंद असलेली महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

Advertisement

१०२ टक्के अधिक अपसंपदा

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप खेडकर यांच्याविरोधात २०१२-१४ सालापासून भ्रष्टाचाराची आणि अपसंपदेची तक्रार दाखल झाली होती. नाशिक विभागाकडून सुरू असलेल्या या चौकशीत, खेडकर यांनी आपल्या सेवाकाळात पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर मार्गाने ही अथांग संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. खेडकर कुटुंबाकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा तब्बल १०२ टक्के अधिक (१३ कोटी ३० लाख रुपये) मालमत्ता आढळल्याने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

खेडकर कुटुंब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

काही महिन्यांपूर्वीच मुलगी पूजा खेडकर हिचे आयएएस पदाबाबतचे बनावट प्रमाणपत्र व गैरवर्तनाचे प्रकरण देशभर गाजले होते. त्यानंतर तिची आई मनोरमा खेडकर यांच्यावरही पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कारवाई झाली होती. आता थेट वडिलांच्या घरावर पडलेल्या 'एसीबी'च्या धाडीमुळे आणि कोट्यवधींच्या अपसंपदेचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडले आहे.

 

Comments

No comments yet.