नाशकात तीन घरे फोडली... तेवीस लाखांचा ऐवज लांबवला...

Share:
Main Image
Last updated: 03-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३ ऑक्टोबर - शहरात घरफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या तब्बल तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ₹२१ लाख ७२ हजार ५०० (सुमारे पौणे तेवीस लाख) रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. यात एका भरदिवसा झालेल्या घटनेचाही समावेश आहे. या प्रकरणी म्हसरूळ, गंगापूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. म्हसरूळमध्ये भरदिवसा घरफोडी (२७ हजारांचा मुद्देमाल चोरीस)

पहिली घटना म्हसरूळ परिसरातील गुलमोहरनगर येथे घडली. या प्रकरणी अविनाश खंडेराव शिंदे (रा. सुखवास्तू, रिया रो-हाऊस) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे कुटुंबिय बुधवारी (३० सप्टेंबर) दुपारी काही कामानिमित्त घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील १७ हजारांची रोकड, चांदीच्या तोरड्या आणि छल्ला असा सुमारे २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार राकेश शिंदे करत आहेत.

२. ध्रुवनगरमध्ये १७.७३ लाखांची मोठी घरफोडी

दुसरी आणि सर्वात मोठी घरफोडी सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील ध्रुवनगर परिसरात घडली. बलरामकुमार राममुरत दुबे (रा. विराज पार्क, कॅनल रोड, धर्माजी कॉलनी) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. दुबे कुटुंबिय १९ ते २९ सप्टेंबर दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ₹७ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल ₹१७ लाख ७३ हजार ५०० चा मुद्देमाल लंपास केला. गंगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप निकम या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Advertisement

३. आर्टिलरी सेंटर रोडवर साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला

तीसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीओम नगर, आर्टिलरी सेंटर रोड येथे घडली. रवींद्र कुमार सिन्हा (रा. अक्षदा हाउसिंग सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते कुटुंबियांसह २ जुलै ते २९ सप्टेंबर या कालावधीत बंगलोर येथे गेले होते. घर दीर्घकाळ बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ₹५० हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹३ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. उपनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पावरा या घटनेचा तपास करत आहेत.

शहरात एकाच वेळी तीन मोठ्या घरफोड्या समोर आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चुंचाळेत तरुणाची आत्महत्या

औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणाºया २८ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किराण राजू देहाडे (रा.आंबेडकरनगर वरचे चुंचाळे) असे मृत युवकाचे नाव आहे. देहाडे या युवकाने बुधवारी (दि.३०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या शेडला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. जमादार चव्हाण या घटनेचा तपास करीत आहेत.

 

Comments

No comments yet.