नाशिक शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच... एकाच दिवसात तीन युवकांनी घेतला गळफास...

Share:
Main Image
Last updated: 02-Oct-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), २ ऑक्टोबर २०२६

शहर आणि परिसर परिसरात आत्महत्येची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी (दि. १) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. अवघ्या १९ ते २९ वर्षे वयोगटातील तीन तरुणांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिघांच्याही आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पहिली घटना: नाशिकरोड (जेलरोड)

पहिली घटना नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथे घडली. भगवती लॉन्सजवळ, मोरेमळा, बालाजीनगर येथील रहिवासी कृष्णा पंढरीनाथ खाडे (वय २९) या युवकाने गुरुवारी सकाळी अज्ञात कारणातून राहत्या घरात छताच्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला.

कुटुंबीयांच्या ही बाब निदर्शनास येताच वडील पंढरीनाथ खाडे यांनी कृष्णाला तातडीने बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार देवरे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: लहवित (देवळाली कॅम्प)

आत्महत्येचा दुसरा प्रकार लहवित (ता. जि. नाशिक) येथे घडला. प्रदिप कांतीलाल लहारे (वय १९) (रा. नवरा नवरी मळा, बाजगिरा) या नवतरुणाने गुरुवारी राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला.

स्थानिक नागरिक योगेश्वर राऊत यांनी प्रदिपला तातडीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली राठोड यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस जमादार जगदाळे तपास करत आहेत.

तिसरी घटना: पाथर्डी फाटा (इंदिरानगर)

तिसरी घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात घडली. अंजना लॉन्सजवळ, नरहरीनगर येथे राहणारा सागर राधाकृष्ण सांगळे (वय २३) या युवकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून आत्महत्या केली.

भाऊ गणेश सांगळे यांनी सागरला बेशुद्ध अवस्थेत तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार देवरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments

No comments yet.