BCCIच्या या ट्रॉफीसाठी नाशिकचा हा खेळाडू महाराष्ट्र संघात...

Share:
Main Image
Last updated: 20-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० जानेवारी - क्रिकेटसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची बी सी सी आय  च्या २३  वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. एलिट गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचे साखळी सामने २३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय कसोटी स्वरूपात विविध ठिकाणी होणार आहेत.

आगामी आय पी एल साठी ३० लाख या रकमेच्या बेस प्राइस -कमीतकमी बोली किंमत वर दिल्ली कॅपिटलने साहिल पारखला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे.  साहिलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी  स्पर्धेत वरिष्ठ महाराष्ट्र संघात पदार्पण केले. १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या  विनू मंकड स्पर्धेत साहिल महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत,  भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.

Advertisement

एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या  शिबीरात  साहिलची सलग तीन वर्षे निवड होत आहे. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील  बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत  इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली होती. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधार पदापाठोपाठ आता आय पी एल नंतर २३ वर्षांखालील सी के नायडू ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

एलिट गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचे, पहिले दोन साखळी सामने सोलापूर येथे होणार आहेत. वेळापत्रक पुढील प्रमाणे - २३ जानेवारी – त्रिपुरा, ३० जानेवारी -पुदुचेरी , ६ फेब्रुवारी -आंध्र ,१३ फेब्रुवारी -दिल्ली.

साहिलच्या या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व सर्व पदाधिकारी आणि संबंधितांनी त्याचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.