महाराष्ट्रातील पर्यटनाला गती देण्यासाठी येथे होणार 'सूर्यकिरण एअर शो'...

Share:
Main Image
Last updated: 02-Oct-2026

 

 

नवी दिल्ली, प्रतिनिधी (२ ऑक्टोबर २०२६) -

महाराष्ट्रातील समृद्ध नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा स्थळांच्या पर्यटन क्षमतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी लोणार सरोवर, अजिंठा आणि वेरूळ येथे भारतीय हवाई दलाचा भव्य 'सूर्यकिरण एअर शो' (Surya Kiran Aerobatic Show) आयोजित करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून २३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान या एअर शोचे आयोजन करण्याची विनंती केली आहे.

युवकांसाठी प्रेरणा अन् पर्यटनाला चालना
संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या पत्रात प्रतापराव जाधव यांनी नमूद केले की, भारतीय हवाई दलाची 'सूर्यकिरण एरोबॅटिक डिस्प्ले टीम' ही आपल्या अचूकता, उच्च कौशल्य आणि थक्क करणाऱ्या हवाई कसरतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अशा प्रात्यक्षिकांमुळे भारताची विमान वाहतूक क्षेत्रातील ताकद तर जगासमोर येतेच, शिवाय देशातील तरुण पिढीला भारतीय हवाई दलात (IAF) सामील होण्याची आणि देशाची सेवा करण्याची मोठी प्रेरणा मिळते.

Advertisement

लोणार, अजिंठा व वेरूळच्या महत्त्वाची दखल
केंद्रीय मंत्र्यांनी पत्रात महाराष्ट्रातील या जागतिक दर्जाच्या तीन प्रमुख स्थळांची वैशिष्ट्ये विशेष अधोरेखित केली:

 * लोणार सरोवर (बुलढाणा):
उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार हे जगातील एक अद्वितीय सरोवर आहे. येथील खारे आणि अल्कधर्मी पाणी तसेच वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना जगभरातील संशोधक व पर्यटकांना आकर्षित करते.

 * अजिंठा व वेरूळ लेण्या (छत्रपती संभाजीनगर):
युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या या ऐतिहासिक लेण्या भारताच्या समृद्ध प्राचीन कला आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

२३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान एअर शोचे नियोजन
प्रतापराव जाधव यांनी संरक्षण मंत्रालयाला विनंती केली आहे की, २३, २४ किंवा २५ नोव्हेंबर २०२६ यापैकी कोणत्याही दिवशी लोणार, अजिंठा व वेरूळ परिसरात सूर्यकिरण टीमच्या प्रात्यक्षिकांना आणि प्रेरणादायी उपक्रमांना आवश्यक मंजुरी देऊन संबंधित प्राधिकरणांना निर्देश द्यावेत.

या प्रस्तावित एअर शोमुळे महाराष्ट्रातील नैसर्गिक व ऐतिहासिक वारशाकडे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल आणि पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet.