नाशिकमध्ये तब्बल ५३,१२० कोटींची गुंतवणूक... २४ हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार... बघा, कुठे कोणती कंपनी येणार?

Share:
Main Image
Last updated: 02-Oct-2026

 

विकास नाशिककर, नाशिक (२ ऑक्टोबर २०२६) -

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा एक ऐतिहासिक टप्पा नुकताच पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि देशापरदेशातील प्रमुख ६५ औद्योगिक कंपन्यांदरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांची (MoU) स्वाक्षरी व देवाणघेवाण करण्यात आली. या एकूण महाकरारांतर्गत राज्यात तब्बल ८.५ लाख कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून २.९१ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

या भव्य औद्योगिक विस्तारात नाशिक जिल्ह्याने मोठी मजल मारली असून, एकट्या नाशिकसाठी ५३,१२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार निश्चित झाले आहेत. यामुळे नाशिक आणि लगतच्या परिसरात २४,१२५ हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नाशिक बनणार 'सेमिकंडक्टर' आणि 'डेटा सेंटर'चे नवीन हब
गेल्या काही वर्षांत ऑटोमोबाईल आणि मद्यनिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नाशिकचा आता माहिती तंत्रज्ञान (IT/ITeS), इलेक्ट्रॉनिक, सेमिकंडक्टर आणि डेटा सेंटर अशा आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत वेगाने विस्तार होत आहे. या करारांमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक 'पाई-सेमिकंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड' (Pi-Semicon Pvt Ltd) या कंपनीची आहे. ही कंपनी नाशिकमध्ये तब्बल ४०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, या एकाच प्रकल्पामुळे १२,७५० तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.

याशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सेंटर क्षेत्रात 'अत्री एनर्जी ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड' ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक (२,५७५ रोजगार) करणार आहे. तर प्रसिद्ध ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड 'हायर प्रायव्हेट लिमिटेड' (Haier Pvt Ltd) २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून १,८०० रोजगार निर्माण करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अन् सेमिकंडक्टर क्षेत्रातील 'व्हर्च्युओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स' कंपनी चांदवड येथे १,०५० कोटींची गुंतवणूक करत १,३०० जणांना रोजगार देणार आहे, तर 'रेव्हॅल्यू रीसायकलिंग' कंपनी १,०१२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ६०० रोजगारांची निर्मिती करेल.

संरक्षण, रसायने आणि पुनर्वापर क्षेत्रातही मोठी मजल
नाशिकची ओळख केवळ आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सपुरती मर्यादित न राहता संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रातही अधिक मजबूत होत आहे. एरोस्पेस आणि डिफेन्स (संरक्षण) क्षेत्रात कार्यरत असलेली 'इंद्रजाल प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी नाशिकमध्ये २,४०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून यामुळे १,१०० जणांना काम मिळेल.

पर्यावरणपूरक आणि रासायनिक उत्पादन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. दिंडोरी येथे 'चिरिपाल पॉली फिल्म्स' १,८५८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून २,००० रोजगारांची निर्मिती करणार आहे. यासोबतच 'दालमिया पॉलिप्रॉ इंडस्ट्रीज' ८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे नाशिकमध्ये २,००० तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील मुख्य गुंतवणूक अशी 

Advertisement

 * पाई-सेमिकंडक्टर: ₹४०,००० कोटी (रोजगार: १२,७५०)

 * अत्री एनर्जी ट्रान्समिशन: ₹४,००० कोटी (रोजगार: २,५७५)

 * इंद्रजाल (एरोस्पेस व डिफेन्स): ₹२,४०० कोटी (रोजगार: १,१००)

 * हायर (Haier): ₹२,००० कोटी (रोजगार: १,८००)

 * चिरिपाल पॉली फिल्म्स (दिंडोरी): ₹१,८५८ कोटी (रोजगार: २,०००)

 * व्हर्च्युओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स (चांदवड): ₹१,०५० कोटी (रोजगार: १,३००)

 * रेव्हॅल्यू रीसायकलिंग: ₹१,०१२ कोटी (रोजगार: ६००)

 * दालमिया पॉलिप्रॉ इंडस्ट्रीज: ₹८०० कोटी (रोजगार: २,०००)

स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पायाभूत सुविधांना नवसंजीवनी
नाशिक, चांदवड आणि दिंडोरी यांसारख्या वेगवेगळ्या भागात ही गुंतवणूक विभागली गेल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा समतोल औद्योगिक विकास होण्यास मदत होणार आहे. या करारांमुळे नाशिकच्या औद्योगिक नकाशाचे रूप पूर्णपणे बदलणार असून, मुंबई-पुणे यांच्यानंतर नाशिक हे राज्यातील सर्वात मोठे तिसरे औद्योगिक आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या गुंतवणुकीमुळे केवळ थेट रोजगारच मिळणार नाही, तर स्थानिक वाहतूक, रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसाय, पुरवठा साखळी आणि इतर सेवा क्षेत्रांनाही मोठा फायदा होईल. तरुणांना आपल्याच शहरात उच्च दर्जाच्या नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याने नाशिकच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे.

Comments

No comments yet.