अक्षय काळे, मुंबई (२ ऑक्टोबर २०२६) -
राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती देत 'महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट'मध्ये तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या करारांमुळे राज्यात सुमारे २ लाख ९१ हजार १०९ नव्या रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उद्योग विभागाचे अधिकारी आणि देश-विदेशातील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते.
क्षेत्रनिहाय गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये:
डेटा सेंटर, IT व सेमिकंडक्टर: सर्वाधिक ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित.
ऊर्जा व क्लीनटेक (ग्रीन एनर्जी): १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपये (नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी व बायोगॅस).
मेटल्स व मायनिंग: ७५ हजार कोटी रुपये.
संरक्षण व अंतरिक्ष (एरोस्पेस व डिफेन्स): २७ हजार ९३० कोटी रुपये (१० करार).
इतर क्षेत्रे: पायाभूत सुविधा (१८,७५१ कोटी), इलेक्ट्रॉनिक्स (१२,६५१ कोटी), केमिकल्स व शेती (८,८०१ कोटी), पोलाद (७,००० कोटी) आणि आरोग्य क्षेत्र (६,५०० कोटी).
'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' व्यासपीठाचा आणि नव्या लोगोचा शुभारंभ
गुंतवणूकदारांना सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हे एकसंघ व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा नवा लोगो लॉन्च करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जमीन, वीज, पायाभूत सुविधा आणि परवानग्या यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पांना गती देणे ही शासनाची जबाबदारी असेल. ‘मेड फॉर बिझनेस’ हीच या उपक्रमाची मुख्य ओळख आहे."
समतोल प्रादेशिक विकास व ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
ही गुंतवणूक केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित नसून नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, अहिल्यानगर आणि रत्नागिरी अशा संपूर्ण राज्यभरात पसरलेली आहे.
२०३० पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट गाठण्यात ही गुंतवणूक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपत जलसंधारण व सामाजिक उपक्रमांतही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून, गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीने काम करेल. गुंतवणूकदाराने प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन यांच्यासह सनदी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या नव्या लोगोमध्ये ‘इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘महाराष्ट्र’ यांचा ‘I’ आणि ‘M’ यांच्या माध्यमातून संगम दाखविण्यात आला आहे. ‘मेड फॉर बिझनेस’ ही या उपक्रमाची ओळख असून, गुंतवणूकदार जेव्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधेल, निर्णयाची अपेक्षा करेल किंवा प्रकल्प सुरू करेल, तेव्हा शासनाला त्यांच्या वेळेचे महत्त्व समजले पाहिजे. समस्येची जबाबदारी स्वीकारून तिचे निराकरण करणे आणि उद्योगाच्या विस्तारापर्यंत शासनाने गुंतवणूकदारांसोबत राहणे, हा ‘मेड फॉर बिझनेस’चा खरा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
६७ सामंजस्य करारांतून ८.५ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभासाठी ६७ प्रस्तावित सामंजस्य करारांचे पोर्टफोलिओ तयार करण्यात आले असून, त्यातून ८.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणि तीन लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणुकीत डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, प्रगत उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण, आरोग्यसेवा आणि कृषीप्रक्रिया यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
प्रस्तावित गुंतवणुकीचा लाभ केवळ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित न राहता स्थानिक लघु व मध्यम उद्योग, पुरवठादार, युवक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग क्षेत्राला केले. मोठ्या उद्योगांनी स्थानिक उद्योगांना आपल्या पुरवठा साखळीत संधी द्यावी, युवकांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांसोबत काम करावे आणि स्थानिक उद्योगांच्या विस्ताराला हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-३ व मुंबई-४च्या विकासाचा मार्ग प्रशस्त
मुंबई-३ आणि मुंबई-४ या शहरांच्या विकासासाठी एमएमआरडीएने सुमारे २१०० चौ.कि.मी. क्षेत्राचे एक्झिस्टिंग (लँड यूज) काम पूर्ण केले असून, ही प्रक्रिया भारतातील सर्वात जलद पूर्ण झालेली (ईएलयू) प्रक्रिया असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या कामामुळे दोन्ही शहरांच्या नियोजित विकासाचा पाया भक्कम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागांत गुंतवणुकीचे प्रस्ताव असल्याने राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘एक ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाच्या दिशेने निर्माण झालेल्या नव्या संधींचा महाराष्ट्राला लाभ करून घेत २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाचा अर्थ अधिक उत्पादक उद्योग, नागरिकांचे वाढते उत्पन्न, सक्षम जिल्हे आणि महाराष्ट्रातच भविष्य घडविण्याचा युवकांचा आत्मविश्वास असा आहे. प्रत्येक गुंतवणुकीने या उद्दिष्टाला हातभार लावला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शिक्षण शहर, मेडिसिटी तसेच एआय आणि इनोव्हेशन सिटी यांसारख्या उपक्रमांमधून उद्योग, कौशल्य, संशोधन, आरोग्य आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुंतवणुकीसोबत जलसंधारणासाठीही उद्योगांनी पुढाकार घ्यावा
कमी पावसामुळे अडचणीत असलेल्या भागातील शेतकरी आणि कुटुंबांच्या समस्यांकडेही उद्योग क्षेत्राने सामाजिक बांधिलकीने पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. उद्योग क्षेत्राने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सढळ योगदान द्यावे, तसेच जलसंधारण, कार्यक्षम सिंचन आणि सांडपाणी पुनर्वापरासाठी संशोधन व अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.