दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांसाठी... मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 02-Oct-2026

 

 

अक्षय काळे, मुंबई (२ ऑक्टोबर २०२६) -

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केल्यानंतर, लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत मंत्रिमंडळ उपसमितीने ट्रिगर-१ व्यतिरिक्त आणखी १९ तालुक्यांमध्ये तातडीने पीक सर्वेक्षण (ग्राउंड ट्रूथिंग) करण्याचे निर्देश दिले आहेत. या १९ तालुक्यांमधील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, असा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

सर्वेक्षण होणारे १९ तालुके (जिल्हानिहाय):

नांदेड: मुदखेड, मुखेड व अर्धापूर

नाशिक: त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड

चंद्रपूर: जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर

गोंदिया: आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया

Advertisement

भंडारा: मोहाडी व तुमसर

सांगली: शिराळा व वाळवा

वर्धा: कारंजा

सातारा: पाटण

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व निर्णय:
ट्रिगर-१ यादीतील तालुक्यांव्यतिरिक्त ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता आहे, त्यांचाही आवश्यकतेनुसार विचार करण्यासाठी स्थानिक पातळीवरील माहिती व अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे तसेच प्रशासन अधिक सतर्क ठेवण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

कर्ज वसुलीबाबत बँकांना सूचना
दुष्काळाबाबतच्या शासन निर्णयानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत  राष्ट्रीयकृत बँकांना  सूचना द्याव्यात.  तर दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांकडून कर्जवसुली करताना कोणतीही सक्ती होणार नाही, याबाबत खासगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांना सूचना सहकार विभागामार्फत दिल्या जाव्यात, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

जनावरांसाठी चारा उपलब्धतेचे नियोजन
आगामी काळात जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील, याची दक्षता पशुसंवर्धन विभागाने घ्यावी. चारा टंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी चारा छावण्यांऐवजी अन्य प्रभावी पर्यायांचा अभ्यास, राज्यातील ज्या भागात चारा उपलब्ध आहे, तेथून आवश्यक भागात चारा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सिलो’ व्यवस्थापन प्रक्रियेचाही अभ्यास करून १५ दिवसांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले.

पाणी पुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन
दुष्काळ तीव्र असलेल्या भागांत आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजनांचा बैठकीत  आढावा घेण्यात आला. गावपातळीवर मोठ्या क्षमतेचे टँकर जाण्यास अडचणी येत असल्यास लहान क्षमतेचे टँकर वापरून पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात यावा. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी, पशुधन आणि नागरिकांना वेळेत आवश्यक मदत मिळावी, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा अशा सूचना देण्यात आल्या.

 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी  मुख्यालय सोडू नये
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. दुष्काळाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

 

Comments

No comments yet.