नाशिक, (प्रतिनिधी) २ ऑक्टोबर - केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण निधी (PSS) योजनेंतर्गत नाफेड (NAFED) व एनसीसीएफ (NCCF) या केंद्रीय नोडल संस्थांमार्फत चालू हंगाम २०२६-२७ मध्ये कांदा खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनियमितता, गैरव्यवस्थापन अथवा अन्य प्रकारच्या तक्रारी असल्यास संबंधित शेतकरी, कांदा उत्पादक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
सहकार संकुलात ८ ऑक्टोबरपर्यंत तक्रार अर्ज स्वीकारणार
महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाच्या निर्णयानुसार ही कांदा खरेदी सुरू आहे. खरेदी प्रक्रियेत कुठेही गैरप्रकार आढळल्यास त्याबाबतची लेखी तक्रार पुराव्यांसह खालील पत्यावर सादर करणे बंधनकारक आहे:
* तक्रार नोंदवण्याचे ठिकाण: जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालय, सहकार संकुल, मौलाना आझाद चौक, सारडा सर्कल, नॅशनल उर्दू हायस्कूलच्या बाजूला, नाशिक.
* अंतिम मुदत: ८ ऑक्टोबर २०२६ (कार्यालयीन वेळेत).
९ ऑक्टोबरला नियोजन भवनात 'खुली सुनावणी'
प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे खुली सुनावणी (Open Hearing) आयोजित करण्यात आली आहे.
या सुनावणीदरम्यान सर्व तक्रारींवर प्रत्यक्ष विचार केला जाणार असल्याने सर्व संबंधित शेतकरी, कांदा उत्पादक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.