उज्जैनला महाकालच्या दर्शनाला गेला... मंदिराबाहेरच हृदयविकाराचा झटका आला... नाशिकच्या आर्किटेक्टचा दुर्दैवी मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 02-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २ ऑक्टोबर - तरुण आर्किटेक्ट रोहित नाना खैरनार (वय ३३) यांचे मध्य प्रदेशातील धार्मिक दौऱ्यावर असताना अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आगर माळवा येथील प्रसिद्ध मां बगलामुखी मंदिराच्या प्रांगणात ही दुर्दैवी घटना घडली.

देवदर्शनादरम्यान दुर्दैवी घटना; सीसीटीव्हीमध्ये कैद झाले क्षण

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित खैरनार हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ते नलखेडा (जि. आगर माळवा) येथील शक्तिपीठ मां बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले.

मंदिराच्या परिसरात चालत असताना अचानक रोहित यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि ते थेट जमिनीवर कोसळले. मंदिराच्या आवारात बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात ही संपूर्ण धक्कादायक घटना कैद झाली आहे.

तत्परतेने रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

Advertisement

रोहित जमिनीवर कोसळताच मंदिरातील सुरक्षारक्षक, मंदिर प्रशासन आणि इतर भाविकांनी तातडीने धाव घेत त्यांना उचलले व स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून नाशिक येथील त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

नाशिकचे प्रसिद्ध फर्निचर कॉन्ट्रॅक्टर, फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे प्रदेश सचिव नानासाहेब बाबूलाल खैरनार यांचे सुपुत्र होते.

तिडकेनगर येथून निघाली अंत्ययात्रा

रोहित खैरनार यांचे पार्थिव नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी तिडकेनगर येथील 'सुंदरबन बंगला' (प्रियंका पार्क) येथून अंत्ययात्रा काढण्यात आली व शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभ्यासू वृत्ती आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व इतर असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या अकस्मात जाण्याने खैरनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नाशिकच्या व्यावसायिक व सामाजिक वर्तुळात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

 

Comments

No comments yet.