समुद्रात ८ मुले बुडाल्याने गिरीश महाजन संतप्त... राज्य सरकार आता...

Share:
Main Image
Last updated: 02-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २ ऑक्टोबर - दिवेआगर येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा अथवा जबाबदारीत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती

या दुर्घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

या वेळी त्यांनी खालील मुद्द्यांवर चौकशी करण्याचे निर्देश दिले:

सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का?

समुद्रकिनारी विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने पाण्यात जाण्याची परवानगी कशी मिळाली?

सोबत असलेल्या शिक्षक व संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली होती का?

Advertisement

विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत देखरेखीसाठी पुरेसे शिक्षक व जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या का?

राज्यभरात शैक्षणिक सहलींसाठी नियमावली

शाळा, महाविद्यालये व खासगी अकादमींकडून सहली किंवा अभ्यासदौरे आयोजित केले जातात. अशा वेळी समुद्र, नदी, धरण आणि तलावांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे बंधनकारक आहे.

यावर भर देताना मंत्री महाजन म्हणाले, "विद्यार्थी कोणत्याही संस्थेचे असोत, त्यांना सहलीला नेताना त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेचीच राहील. भविष्यात अशा दुर्दैवी दुर्घटना टळाव्यात यासाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर स्पष्ट मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल."

कुटुंबीयांप्रती संवेदना व प्रशासनाला सूचना

दुर्घटनेत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांबद्दल मंत्री महाजन यांनी तीव्र शोकसंवेदना व्यक्त केली. मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रशासनाने आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, तसेच शवविच्छेदन व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलतेने व तत्परतेने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

Comments

No comments yet.