नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व आरोग्य सुविधांचे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
श्रीक्षेत्र सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कुंभमेळा २०२७ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, नियोजन उपायुक्त योगेंद्र चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सप्तशृंग गडासाठी व्यापक नियोजनावर भर
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी येणारे लाखो भाविक सप्तशृंग गडासह परिसरातील धार्मिक स्थळांना भेट देतात. त्यामुळे केवळ मुख्य कुंभ क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सर्व धार्मिक स्थळांशी समन्वय साधून नियोजन केले जात आहे.
* वाहने व आपत्कालीन सेवा: वणी, नांदुरी व गड परिसरात बसस्थानक, शटल सेवा आणि पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करावी. तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करावा.
* पायाभूत सुविधा: सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) गडावर ९ कामे प्रस्तावित असून, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
स्वच्छता, कचरा प्रक्रिया अन् 'निर्माल्य' व्यवस्थापन
गडावरील संभाव्य कचरा लक्षात घेऊन सध्याच्या कचरा निर्मितीचा बेसलाइन डेटा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
* अतिरिक्त मनुष्यबळ, डस्टबिन, कचरा संकलनासाठी वाहने व तात्पुरत्या प्रक्रिया यंत्रणेची शक्यता तपासली जाईल.
* ओल्या कचरा प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (DPR) तयार करून सीएसआर (CSR) किंवा इतर निधीतून आर्थिक स्रोत उभारला जाईल.
* निर्माल्य स्वतंत्र संकलित करून त्यापासून अगरबत्ती व धूपबत्ती तयार करणाऱ्या संस्था/स्टार्टअप्सशी समन्वय साधला जाईल.
आरोग्य सुविधा व जिल्हा परिषदेची तयारी
जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार यांनी सांगितले की, स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे. धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांनी ट्रस्टच्या वतीने गडावर प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) उभारण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत भाविकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळेल.
स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पोलीस व देवस्थान प्रशासनाने आपापसांत समन्वय ठेवून सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन शेवटी करण्यात आले.