नाशिक रिंगरोड लगत हा झोन उभारणार... 'निमा'च्या बैठकीत कुंभमेळा आयुक्तांची मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 01-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात राबवले जाणारे पायाभूत सुविधांचे प्रकल्प केवळ सणापुरते मर्यादित नसून, ते शहराच्या पुढील १५ ते २० वर्षांच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीची पायाभरणी करत आहेत. रिंग रोड, एक्स्प्रेसवे, मजबूत वीज वितरण, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या विकासकामांच्या बळावर नाशिक आगामी काळात देशातील एक प्रमुख गुंतवणूक व औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा ठाम विश्वास कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) सभागृहात आयोजित उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसोबतच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल व किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे आणि संतोष मंडलेचा यांच्यासह उद्योजक व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

रिंग रोड, आयटी व विशेष औद्योगिक झोनवर भर

कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणाऱ्या रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासोबतच मालवाहतूक कमालीची सुलभ होईल. रिंग रोडलगतच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करून आगामी विकास आराखड्यात आयटी (IT), ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) आणि एमएसएमई (MSME) क्षेत्रासाठी विशेष झोन विकसित करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

वीज आणि सांडपाणी व्यवस्थापनाची मोठी क्षमता 

 * अखंडित वीजपुरवठा: औद्योगिक गरजा भागवण्यासाठी ४०० केव्हीचे एक, २२० केव्हीची दोन आणि १३२ केव्हीची चार अशी नवीन उपकेंद्रे उभारण्यात आली असून, यामुळे १,६०० ते २,००० एमव्हीए क्षमतेची वीज उपलब्ध होणार आहे.

Advertisement

 * पर्यावरण व सांडपाणी प्रक्रिया: ४६ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वाकडे असून, ३८५ किलोमीटरचे सांडपाणी वाहिनीचे जाळे विकसित केले जात आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांनी पर्यावरणीय नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

डिजिटल नेटवर्क आणि सुशोभीकरण

शहरातील २० प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण, ऑप्टिकल फायबर, सीसीटीव्ही आणि अत्याधुनिक कमांड सेंटरच्या माध्यमातून नाशिकचे डिजिटल नेटवर्क सक्षम केले जात आहे. रस्त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी सार्वजनिक-खासगी सहभागातून (PPP Model) काम करण्यावर भर देण्यात येत आहे.

कुंभमेळ्याची कामे स्थानिक उद्योजकांना मिळावीत: 'निमा'

निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पायाभूत कामांचे स्वागत केले. "रिंग रोड, वीज, पाणी आणि दळणवळणाच्या चांगल्या सुविधांमुळे नवीन उद्योग व गुंतवणूक नाशिककडे आकर्षित होईल," असे सांगत, या विकासकामांचे कंत्राट नाशिकमधील स्थानिक उद्योग क्षेत्राला प्राधान्याने मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. नाशिकला देशाच्या औद्योगिक नकाशावर अग्रस्थानी नेण्यासाठी 'निमा' प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

Comments

No comments yet.