नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - एकतर्फी प्रेमातून एका २४ वर्षीय तरुणाने तरुणीचा विनयभंग करत तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची आणि स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना औद्योगीक वसाहतीतील पाईपलाईन रोड परिसरात घडली आहे. तरुणीचे ठरलेले लग्न मोडून, समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर बदनामीकारक मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव संजय गायकवाड (वय २२, मूळ रा. हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर; सध्या रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, गंगापूर रोड, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पाईपलाईन रोड परिसरातील पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.
नेमका प्रकार काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि संशयित वैभव हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या काही काळापासून संशयित वैभव हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता व तिला सतत त्रास देत होता.
ठरलेले लग्न मोडले: पीडित तरुणीचे लग्न ठरल्याचे समजताच संशयिताने संबंधित मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना धमकावले. या धमकीमुळे तरुणीचे ठरलेले लग्न मोडून गेले.
ॲसिड हल्ल्याची धमकी: “माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकेन,” अशी थेट धमकी देत त्याने तरुणीला मानसिक त्रासाच्या गर्तेत ढकलले.
व्हॉट्सॲप ग्रुपवर बदनामी आणि आत्महत्येची धमकी
संशयिताचा त्रास एवढ्यावरच थांबला नाही. त्याने गेल्या मंगळवारी (२२ सप्टेंबर) समाजाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर “आमचे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून संबंध असून आमचे लग्न लावून द्या,” असा मेसेज टाकून तरुणीची व तिच्या कुटुंबाची तीव्र बदनामी केली.
तसेच, “मी आत्महत्या करणार असून त्याला पीडिता आणि तिचे कुटुंबच जबाबदार राहील,” असा धमकीचा मेसेजही ग्रुपवर व्हायरल केला. या सततच्या मानसिक छळाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली.
पोलीस कारवाई सुरू
पीडितेच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी संशयित वैभव गायकवाड याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दहिफळे करत आहेत.
कट मारल्याच्या बहाण्याने पैसे लांबवले
कट मारल्याची कुरापत काढून एकाने दुचाकीस्वाराच्या खिशातील पाकिटावर डल्ला मारला. हा प्रकार रविवार कारंजा भागात घडला. या घटनेत भामट्याने २० हजार ५०० रूपयांची रोकड लांबविली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र धोंडू वंडजुवाणी (४८ रा. भाभानगर मुंबईनाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वंडजुवाणी गेल्या गुरूवारी (दि.२४) रविवार कारंजा भागात गेले होते. वैश्य ट्रेडर दुकानासमोरून ते एमएच १५ एचडी २१३३ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पाठीमागून बर्कमॅन एमएच १५ एचझेड २०६२ या मोटारसायकलवर आलेल्या भामट्याने वंडजुवाणी यांची वाट अडवित कट का मारला याबाबत जाब विचारत वाद घातला. यावेळी भामट्याने धक्काबुक्की करीत वंडजुवाणी यांच्या खिशातील रोकड असलेले पाकिट हातोहात लांबविले. या पाकिटात २० हजार ५०० रूपयांची रोकड होती. या गुह्याचा तपास हवालदार बागुल करीत आहेत.