२ ऑक्टोबरच्या ग्रामसभांमध्ये होणार हा विशेष ठराव...

Share:
Main Image
Last updated: 01-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी ) १ ऑक्टोबर -  मुलगा-मुलगी समानता रुजवण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आगामी ग्रामसभेत ‘स्त्री जन्म स्वागत’ या विषयावर विशेष चर्चा करून ठराव पारित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांनी केले आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व ग्रामसभांमध्ये हा ठराव मांडला जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपक्रम

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'PCPNDT' (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र - लिंग निवडीस प्रतिबंध कायदा) समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते.

गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी PCPNDT कायदा, १९९४ (सुधारित २००३) ची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच व्यापक सामाजिक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून, त्यात समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याने ग्रामपंचायत स्तरावरून या अभियानाला गती दिली जात आहे.

ग्रामसभांमध्ये होणार 'या' विषयांवर मंथन

२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये खालील प्रमुख मुद्द्यांवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल:

Advertisement

 * स्त्री जन्माचे महत्त्व आणि मुलगा-मुलगी समानता

 * मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता

 * स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि कायद्यातील कडक तरतुदी

 * 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' हा संदेश घराघरांत पोहोचवणे

 “ग्रामसभा हे लोकसहभागातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘स्त्री जन्म स्वागताचा’ ठराव करून हा सकारात्मक संदेश घराघरांत पोहोचवावा. स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि सामाजिक जनजागृती या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”

— ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

Comments

No comments yet.