नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तश्रुंगी गडावर आगामी आश्विन नवरात्रोत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवातील भाविकांची अलोट गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबरपासून सप्तश्रुंगी गडावर खासगी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार आहे.
कळवणच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी काश्मिरा संखे यांच्या अध्यक्षतेखाली श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतान हॉलमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन धातोंडे, पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.
९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान विशेष नियोजन
सप्तश्रुंगी गडावर आश्विन नवरात्रोत्सव यात्रा ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरदरम्यान पार पडणार असून, त्यानंतर २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. या संपूर्ण कालावधीत कायदा व सुव्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत.
वाहतूक आणि इतर महत्त्वाचे निर्णय:
एसटी बसची सुविधा: खासगी वाहनांवर बंदी असल्याने नांदुरी ते सप्तश्रुंगी गड यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (ST) अतिरिक्त बसेसची सोय करण्यात येणार आहे.
नांदुरी-गड रस्त्याचे काम: नांदुरी ते सप्तश्रुंगी गड रस्त्याचे उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिक्रमणविरोधी मोहीम: पावसामुळे रखडलेली अतिक्रमण हटाव मोहीम वनविभाग आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यात्रा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल.
आपत्कालीन सेवा आणि सुरक्षा: अरुंद रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन प्रसंगी तातडीने पोहोचण्यासाठी एक 'मिनी फायर टेंडर' (छोटे अग्निशामक वाहन) तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्लास्टिक बंदी व स्वच्छता: गडावर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी, धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर्स आणि रोषणाई, तसेच रोपवे प्रकल्पाच्या स्वच्छतेची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले आहे.