पुणे, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - एकीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हटले की प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक बोलीभाषांचा विचार डोळ्यांसमोर येतो. मात्र, पुणे जिल्हा परिषदेने या संकल्पनेला छेद देत एक अत्यंत अनोखा व स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तराशी जोडण्यासाठी चक्क जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाच परकीय भाषांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 'पुणे जिल्हा परिषद' आणि 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'चा परकीय भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून, यावर्षी जिल्ह्यातील २१९ शिक्षक पाच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषांचे धडे गिरवत आहेत.
उपक्रमाचे दुसरे वर्ष; २१९ शिक्षक घेतायत प्रशिक्षण
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा जिल्ह्यातील २१९ शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ५ प्रमुख आंतरराष्ट्रीय भाषांचा समावेश आहे:
जर्मन भाषा: १२६ शिक्षक
जपानी भाषा: २५ शिक्षक
रशियन भाषा: २३ शिक्षक
फ्रेंच भाषा: २२ शिक्षक
स्पॅनिश भाषा: २२ शिक्षक
शिक्षकांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता ऐकणे, वाचन, लेखन आणि संभाषण या चारही कौशल्यांवर प्रभुत्व मिळवता यावे, यासाठी १८० तासांचा संरचित अभ्यासक्रम (Structured Course) राबवण्यात येत आहे.
गतवर्षी ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना झाला फायदा
या उपक्रमाच्या पहिल्या वर्षी १०२ शिक्षकांनी परकीय भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. या शिक्षकांनी आपल्या वर्गातील सुमारे ५०-५० विद्यार्थ्यांपर्यंत या भाषांची प्राथमिक माहिती, अभिवादन आणि त्या देशांच्या संस्कृतीचा परिचय पोहोचवला. यामुळे पहिल्याच वर्षी ग्रामीण भागातील ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मिळाला.
शिक्षकांच्या माध्यमातून ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जगातील विविध भाषा आणि संस्कृतींबद्दलचे कुतूहल कमालीचे वाढले आहे.
स्थानिक माती अन् जागतिक दृष्टी
शहरी भागातील विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध असतात; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही दरी मोठी होती. हा उपक्रम हीच दरी मिटवण्याचे काम करत आहे. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेत असतानाच जगाशी जोडले जाण्याची संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे.
"परकीय भाषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध भाषा, संस्कृती आणि जागतिक संदर्भांची ओळख करून देता येते. हा उपक्रम शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसोबतच त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा आहे."
— गजानन पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद)
ग्रामीण भागातील एका साध्या वर्गखोलीतून सुरू झालेला हा प्रवास येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.