नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - गोदाकाठच्या नाशिक शहरात विजयादशमी व नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर भक्तीचा रंग गडद होणार आहे. शहरातील गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संचलित श्री व्यंकटेश बालाजी मंदिर आणि कापड पेठ येथील ऐतिहासिक श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टच्या वतीने ११ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'शारदीय ब्रह्मोत्सव २०२६' व 'श्री पद्मावती नवरात्रोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण पंधरा दिवसांच्या कालावधीत नाशिककरांना विविध धार्मिक, संस्कृतिक कार्यक्रमांसह विशेष पूजेचे यजमानपद भूषवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
गंगापूर रोडवरील मंदिरात १५ दिवस धार्मिक व सांस्कृतिक सोहळा
गंगापूर रोड येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता पवित्र मंत्रोपचारांनी ब्रह्मोत्सवाचा आणि नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल. न्यासातर्फे ध्वजारोहण आणि हितचिंतक संजय चंद्रात्रे यांच्या हस्ते पूजेचा प्रारंभ होणार असून, वीणा प्रसाद गोखले यांचे गायन रंगणार आहे.
११ ते १६ ऑक्टोबर: नित्य सप्तशती पाठ, अखंड दीपप्रज्वलन, फलार्चना, 'अमृतानुभव' कार्यक्रम, पुष्पार्चना, ललिता पंचमीनिमित्त सामूहिक कुमारिका पूजन, भजनसंध्या आणि सामूहिक तुळशी अर्चना होणार आहे.
१७ ऑक्टोबर (सप्तमी): पहाटे बालाजी कल्याणम् (विवाह सोहळा) पार पडेल.
१९ व २० ऑक्टोबर (अष्टमी व नवमी/दसरा): नवचंडी हवन व दसऱ्याच्या दिवशी नवरात्र विसर्जन होईल.
२१ ते २५ ऑक्टोबर: दशमीपासून वार्षिक पूजा, अभिषेक स्नान, अक्षता-यंत्रार्चना आणि विष्णुसहस्त्रनाम पठण पार पडेल.
२५ ऑक्टोबर (कोजागिरी पौर्णिमा): उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला लाडू अर्चना, सुंदरकांड पठण, दीपपद्म रचना आणि दीपा मोपानी बक्षी यांच्या कथ्थक नृत्याने होईल. या दिवशी गरुडपूजेने ब्रह्मोत्सवाची सांगता केली जाईल.
कापड पेठेतील संस्थानात विशेष अनुष्ठानांची रेलचेल; यजमान नोंदणी सुरू
कापड पेठ येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टच्या वतीने ब्रह्मोत्सवाचे औचित्य साधून विशेष धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना यामध्ये यजमान म्हणून प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे.
विशेष धार्मिक सेवा आणि वेळापत्रक:
श्रीनिवास कल्याणम् (विवाह सोहळा): शनिवार, १७ ऑक्टोबर (सायंकाळी ६:०० वाजता) – केवळ ४ यजमानांना संधी.
अष्टोत्तरशत कलशाभिषेकम: रविवार, १८ ऑक्टोबर (सकाळी १०:३० ते दुपारी १:००) – १०८ कलशांनी विधीवत अभिषेकासाठी १०८ यजमानांची मर्यादा.
पवमान अभिषेक: गुरुवार, २२ ऑक्टोबर (सायंकाळी ५:०० वाजता) – २१ यजमानांना पूजेचा मान.
व्यंकटेश्वर होम (विष्णु याग): रविवार, २५ ऑक्टोबर (सकाळी ९:०० वाजता) – ३६ यजमानांची मर्यादा.
'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' – भाविकांना सहभागाचे आवाहन
या सर्व पूज विधींसाठी 'प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' दिले जाणार असून, माहितीपत्रकावरील QR Code स्कॅन करून भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येईल, अशी माहिती संस्थानचे महंत व ट्रस्टी डॉ. रमेश बालाजीवाले तसेच सचिव ॲड. हर्षवर्धन बालाजीवाले यांनी दिली आहे.
पूजा नोंदणी व अधिक माहितीसाठी भाविकांनी श्री. विक्रम बालाजीवाले (मोबाईल : ९८९०६०५५४२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या धार्मिक व सांस्कृतिक पर्वाचा लाभ सर्व नाशिककर भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.