निवडणुकीत विरोधात काम केल्याने केले हे कृत्य...

Share:
Last updated: 20-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० जानेवारी - महापालिका निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या वादातून टोळक्याने एका कुटूंबियास धमकी दिल्याचा प्रकार चौक मंडईत घडला. घरासमोर येवून व मोबाईलवर संपर्क साधत टोळक्याने हे कृत्य केले असून भेदरलेल्या कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओवेस जाकिर कोकणी, गौस हुसेन साहब कोकणी, आयाज मोईन कोकणी व त्यांचा एक साथीदार (रा.सर्व कोकणीपुरा ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत शेख जाफर जैनुद्दीन (रा.माळी गल्ली, चौकमंडई) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचे बंधू वसिम शेख रविवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास आपल्या घराबाहेर असतांना दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्यांना निवडणुकीत विरोधात काम केल्याची कुरापत काढून दमदाटी केली. यावेळी संशयितांनी कुटूंबियास उचलून घेऊन जाण्याची व दोघा भावांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. यानंतर जाफर शेख यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून संशयितांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

Advertisement

खिशातील मोबाइल लांबवला

नाशिक - देवळाली कॅम्प येथील संडे बाजारातील गर्दीची संधी साधून चोरट्यांनी एकाच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविला. या घटनेत सुमारे २० हजार रूपये किमतीचा मोबाईलवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
महेंद्र जिता प्रसाद (रा.बेलतगव्हाण ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महेंद्र प्रसाद हे रविवारी सायंकाळी संडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते.
 मच्छी मार्केटमध्ये ते खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविला. या गुन्ह्याचा तपास हवालदार सिध्दपुरे करीत आहेत.

Comments

No comments yet.