नाशिकमध्ये टवाळखोरांचा धुमाकूळ... लोखंडी रॉडने रिक्षासह दोन कार फोडल्या... दुचाकीस्वारांची मध्यरात्री दहशत...

Share:
Main Image
Last updated: 01-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १ ऑक्टोबर - शहरात गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी आणखी एक धक्कादायक घटना पंचवटीतील मोरे मळा परिसरात घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन डोकेफिरू तरुणांनी मोठ्याने आरडाओरड करत परिसरात प्रचंड दहशत माजवली. काहीही कारण नसताना या दुकलीने हातात लोखंडी रॉड घेऊन रस्त्यावर पार्क केलेल्या एका ऑटोरिक्षासह दोन महागड्या कारची तोडफोड केली. या घटनेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमका काय घडला प्रकार?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर गगुलाल चव्हाण (वय ४५, रा. गुंजाळ फार्मसमोर, रामनगर लेन क्र. २, मोरे मळा, पंचवटी) हे रिक्षाचालक असून त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चव्हाण मंगळवारी (दि. २९) रात्री नेहमीप्रमाणे आपल्या व्यवसायानिमित्त घराबाहेर पडले होते. मध्यरात्रीच्या सुमारास आपले काम आटोपून ते घरी परतले. घरासमोर आपली ऑटोरिक्षा पार्क करत असतानाच, अचानक दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण मोठ्याने आरडाओरड करत गल्लीत आले.

लोखंडी रॉडने केला वाहनांचा चक्काचूर

Advertisement

कोणताही वाद अथवा कारण नसताना या दोन्ही संशयितांनी हातात असलेल्या लोखंडी रॉडने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम चव्हाण यांच्या एमएच १५ जेए ५२८४ या ऑटोरिक्षाच्या काचांवर जोरदार प्रहार करत तिचे नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच ४३ एबी १७७८ आणि एमएच १५ बीएन ७३७१ या दोन कारवरही लोखंडी रॉडने सपासप वार करून त्यांच्या काचा फोडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आणि मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. तोडफोड केल्यानंतर दोन्ही हल्खोर दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

परिसरात घबराट; पोलिसांकडून तपास सुरू

शांतताप्रिय मानल्या जाणाऱ्या मोरे मळा परिसरात मध्यरात्री घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाहनांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. रात्रीच्या वेळी शहरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

 

Comments

No comments yet.