राज्यात खरेदी करण्यात आलेल्या शेतपिकांबाबत मंत्री छगन भुजबळांनी दिले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 01-Oct-2026

अक्षय काळे, (मुंबई) १ ऑक्टोबर - किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी सर्व प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे कडक निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. "शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची हमीभावाची रक्कम वेळेत मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून, या प्रक्रियेत कोणताही अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

पणन हंगामात झालेली धान्य खरेदी:

पणन हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात 'एमएसपी' अंतर्गत धान, ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार खरेदीचा तपशील खालीलप्रमाणे:

धान खरेदी: १,०३,८०,१९६.७० क्विंटल

मका खरेदी: १०,०५,१११ क्विंटल

ज्वारी खरेदी: ५५,१८३.७० क्विंटल

Advertisement

रागी खरेदी: ४,६२४ क्विंटल

बाजरी खरेदी: ५१०.५० क्विंटल

याशिवाय, रब्बी पणन हंगामातील खरेदीमध्ये धान, ज्वारी आणि मका यांचा समावेश असून, उपलब्ध नोंदीनुसार एकूण १,०८,२१,४०४.६० क्विंटल धान्याची खरेदी झाली आहे.

थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश

शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली रक्कम आणि अद्याप अदा करावयाची प्रलंबित देयके यांची विभागनिहाय माहिती शासनाने संकलित केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित धान व भरडधान्याची हमीभावाची रक्कम मिळण्यासाठी विनाकारण वाट पाहावी लागू नये, यासाठी सर्व प्रलंबित देयकांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (DBT द्वारे) जमा करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी दिल्या.

एमएसपी योजनेंतर्गत खरेदी प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व संबंधित यंत्रणांनी उपलब्ध निधी, प्रलंबित देयके आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांची देयके प्राधान्यक्रमाने अदा करावीत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Comments

No comments yet.