नाशिक, (प्रतिनिधी) ३० सप्टेंबर - शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. शहरात महिला आणि मुली असुरक्षित असल्याचे विदारक वास्तव समोर आले असून, राजरोसपणे विनयभंगाचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या तिघींचा विनयभंग करण्यात आल्याच्या तीन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेत पाळीव कुत्रा फिरवण्याच्या क्षुल्लक वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आला, तर अन्य दोन घटनांमध्ये अल्पवयीन मुलींचा एकतर्फी प्रेमातून छळ करत विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी उपनगर, पंचवटी आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO) कायद्यासह विनयभंगाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: पाळीव कुत्रा फिरवण्याच्या वादातून उपनगर परिसरात महिलेचा विनयभंग
पहिली घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनलरोड परिसरात घडली. याप्रकरणी एका विवाहित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडितेचे पती सोमवारी (दि. २८) रात्री नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी आम्रपाली झोपडपट्टी परिसरात घेऊन गेले होते. त्यावेळी तेथे राहणाऱ्या सुनिता साळवे, अभिषेक साळवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकाने "या भागात कुत्रे फिरवायचे नाही" असे म्हणत पीडितेच्या पतीसोबत जाणीवपूर्वक वाद घातला. हा वाद वाढत असल्याचे पाहून पीडितेची नणंद आपल्या भावाच्या मदतीसाठी धावून गेली. मात्र, संशयितांनी तिची गळचेपी करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना: ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची वाट अडवली; संशयितास पंचवटी पोलिसांकडून अटक
दुसरी घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोड भागात घडली. पेठरोड परिसरातील एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि. २९) सायंकाळच्या सुमारास आपल्या शिकवणीला (ट्युशन) जात होती. दत्तनगर परिसरातील बच्छाव हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून आलेल्या रोहित उर्फ रोहिल्या प्रकाश गायकवाड (वय २०, रा. मच्छीबाजार, भराडवाडी, फुलेनगर) आणि काळू जाधव या दोघांनी मुलीची वाट अडवली. रोहित गायकवाड याने "मला तू खूप आवडतेस, माझ्या गाडीवर बस" असा अट्टाहास करत तिचा विनयभंग केला. मुलीने त्यास तीव्र विरोध केला असता, सोबती काळू जाधव याने "गाडीवर बस, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकू" अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य संशयित रोहित गायकवाड याला अटक केली आहे. उपनिरीक्षक पुंडलिक पावशे या घटनेचा तपास करत आहेत.
तिसरी घटना: मुंबईनाका परिसरात एकतर्फी प्रेमातून चाकूचा धाक दाखवून धमकी
तिसरी गंभीर घटना मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातेमानगर भागात घडली. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, साहिल शहा (रा. साठेनगर) हा तरुण तिला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्रास देत होता. सुमारे एका महिन्यापूर्वी मायरॉन इंग्लिश स्कूल जवळील वडापावच्या दुकानाजवळ संशयिताने तिचा विनयभंग केला होता, परंतु बदनामीच्या भीतीने मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, संशयिताची हिंमत वाढल्याने त्याने रविवारी (दि. २०) रात्री थेट मुलीचे घर गाठले आणि परिसरात मोठा आरडाओरडा करत गोंधळ घातला. मुलीला घराबाहेरील मोकळ्या जागेत नेऊन त्याने जबरदस्तीने प्रेमाची मागणी घातली. मुलीने त्यास स्पष्ट नकार दिला असता, माथेफिरू साहिलने खिशातून चाकू काढून तिला धाक दाखवला आणि कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक निसार शेख तपास करत आहेत.
नाशिककरांमधून तीव्र संताप; कडक कारवाईची मागणी
भरदिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचा पाठलाग करून त्यांचा छळ करणे, चाकूचा धाक दाखवणे आणि महिलांवर हात टाकण्याच्या वाढत्या घटनांमुळे नाशिककर महिला व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी शहरात 'निर्भया पथका'ची गस्त वाढवावी आणि अशा नराधमांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.