नाशिक पोलिसांची थेट गोव्यात धडाकेबाज कारवाई... या फसवणुकीचा पर्दाफाश...

Share:
Main Image
Last updated: 30-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३० सप्टेंबर - व्हॉट्सॲपवर अनधिकृत एपीके (APK) लिंक पाठवून क्रेडिट कार्डचा गैरवापर करत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या दिल्ली येथील एका अट्टल सायबर गुन्हेगाराच्या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सायबर पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने हडप केलेली ६ लाख २८ हजार ६५८ रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून, संशयिताला थेट गोव्यातील एका आलिशान रिसॉर्टमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

पुष्पेंद्र गणेशकुमार प्रसाद उर्फ विहान मल्होत्रा (वय - रा. करकरडुमा, पूर्व दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या सायबर भामट्याचे नाव आहे.

व्हॉट्सॲप हॅक करून क्रेडिट कार्डवर मारला डल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील रमजानपुरा भागातील एका नागरिकाला अनधिकृत 'APK' फाईल पाठवून भामट्याने त्यांचे व्हॉट्सॲप हॅक केले. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डचा परस्पर वापर करून तब्बल ६ लाख २८ हजार ६५८ रुपये एका भलत्याच खात्यात वर्ग करून घेतले. बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने तात्काळ नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांची 'ॲक्शन मोड'मध्ये कारवाई; गोव्यात लावला सापळा

घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एस. यांनी तातडीने तपासचक्रे हलवण्याचे निर्देश दिले.

Advertisement

पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, सुवर्णा आहेर, अंमलदार तुषार खालकर, विशाल चौधरी, हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करत दिवस-रात्र एक करून तपास सुरू केला. पथकाने आधी तक्रारदाराची वर्ग झालेली संपूर्ण सव्वा सहा लाखांची रक्कम तांत्रिक प्रक्रियेद्वारे सुरक्षितपणे परत मिळवली.

त्यानंतर आरोपीचा माग काढत पोलिसांचे पथक थेट गोव्यात पोहोचले. तेथील 'हेरिटेज व्हिलेज' या अलिशान रिसॉर्ट परिसरात अचानक सापळा रचून आरोपी पुष्पेंद्र प्रसाद याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

नागरिकांना नाशिक ग्रामीण पोलिसांचे आवाहन

या धडाकेबाज कारवाईनंतर नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष जनजागृतीपर आवाहन जारी केले आहे:

अनोळखी लिंक्स टाळा: मोबाईलवर किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी, अनधिकृत एपीके (APK) फाईल्स किंवा लिंक्सवर कधीही क्लिक करू नका.

खाजगी माहिती शेअर करू नका: अनोळखी फोन कॉल्स किंवा मेसेजवर विश्वास ठेवून बँक खात्याचा तपशील, सीव्हीव्ही (CVV) अथवा ओटीपी (OTP) कोणालाही देऊ नका.

तात्काळ संपर्क साधा: अनावधानाने कोणतीही फसवणूक झाल्यास विलंब न करता तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी अथवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० (1930) वर त्वरित संपर्क साधावा.

 

Comments

No comments yet.