विश्वासू नोकरानेच मारला डल्ला... रिंगरोडच्या मोबदल्यातील तब्बल ७ कोटींच्या रक्कमेचा अपहार...

Share:
Main Image
Last updated: 30-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३० सप्टेंबर - जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका नामांकित व्यावसायिकाच्या अज्ञानाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेत त्यांच्याच विश्वासू नोकराने साथीदारांच्या मदतीने बँक खात्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. मृत मालकाच्या स्वाक्षरीयुक्त कोऱ्या धनादेशांचा (Cheques) गैरवापर करून संशयितांनी तब्बल ७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम हातोहात लांबवली. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्शन अशोक थोरात, सुलभ कोईराला, शुभम सोनवणे आणि सफायर रिअल इस्टेटचा मालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हेमंत प्रकाश आगळे (रा. आगळे मळा, दिंडोरी रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

रिंगरोडच्या मोबदल्यात मिळाली होती कोट्यवधींची रक्कम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत आगळे यांचे वडील कै. प्रकाश आगळे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय होता. पंचवटी कारंजा येथील 'मानस आर्केड' या इमारतीत त्यांचे कार्यालय होते. प्रकाश आगळे अशिक्षित असल्याने त्यांना फारसे लिहिता-वाचता येत नव्हते; मात्र जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात त्यांचा मोठा हातखंडा होता.

Advertisement

त्यांनी २०१० मध्ये मानोरी शिवारात घेतलेल्या जमिनीतील काही भाग सिंहस्थ कुंभमेळा रिंगरोडसाठी अधिग्रहित करण्यात आला होता. त्याचा कोट्यवधी रुपयांचा शासकीय मोबदला आगळे यांच्या शहरातील एका नामांकित को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यात जमा झाला होता. त्यांच्या कार्यालयात दर्शन थोरात हा तरुण कामकाज सांभाळत असल्याने तो आगळे यांच्या विश्वासातील होता.

निधनानंतर बँक खात्यांची पडताळणी गर्ली अन् भांडाफोड झाला

काही काळापूर्वी प्रकाश आगळे आजारी पडल्याने संशयित नोकर दर्शन थोरात याने कार्यालयातील मोबाईल आणि स्वाक्षरी केलेल्या कोऱ्या धनादेशांचा गैरवापर सुरू केला. मार्च ते जुलै या कालावधीत त्याने कटकारस्थान रचून स्वःताच्या व इतर संशयितांच्या नावे मोठ्या रकमा टप्प्याटप्प्याने अन्य बँक खात्यांत वर्ग करून एकूण ७ कोटी ४ लाख रुपये हडप केले.

दरम्यान, प्रकाश आगळे यांचे नुकतेच निधन झाले. निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने कार्यालयाची झडती घेतली आणि जमीन व्यवहारांसह बँक खात्यांची पडताळणी केली असता, खात्यातील कोट्यवधींची रक्कम गायब असल्याचे समोर आले. संशयितांनी कार्यालयातील इतरही महत्त्वाच्या जमिनींचे खरेदीखत लांबवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 

Comments

No comments yet.