केशव खेडकर, (नाशिक) ३० सप्टेंबर - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या निवासाची योग्य सोय व्हावी, यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी आता खासगी जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपात 'टेंट सिटी' (तंबूंची वसाहत) उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणाने सविस्तर कार्यपद्धती (SOP) जाहीर केली असून, किमान दोन एकर जमीन असलेल्या खासगी जमीनमालकांना किंवा ऑपरेटर्सना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
टेंट सिटीसाठी 'हे' निकष असणार बंधनकारक
प्राधिकरणाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, टेंट सिटी उभारण्यासाठी काही कठोर अटी आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत:
* जमिनीची अट: प्रस्तावित जागा नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत, सलग आणि कोणत्याही बोजामुक्त स्वरूपाची असावी. जमिनीचे क्षेत्रफळ किमान दोन एकर असणे आवश्यक आहे. ही उभारणी पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असेल आणि मंजूर कालावधी संपल्यानंतर सर्व तंबू हटवून जागा मूळ स्थितीत आणून द्यावी लागेल.
* पायाभूत सुविधा: निवासासोबतच स्वच्छतागृहे, स्नानगृहे, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, मुबलक पिण्याचे पाणी, अखंड वीज, कचरा व्यवस्थापन, अन्न-भोजन व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देणे ऑपरेटरवर बंधनकारक असेल.
पर्यावरण रक्षण आणि कचरा-सांडपाणी व्यवस्थापनावर भर
कुंभमेळ्यादरम्यान पर्यावरण आणि आरोग्याची हानी होऊ नये, यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत:
* सांडपाण्यावर बंदी: कोणत्याही परिस्थितीत नदी, नाला किंवा नैसर्गक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडता येणार नाही. उघड्यावर कचरा टाकणे अथवा जाळण्यास सक्त मनाई असेल.
* पाण्याची गुणवत्ता तपासणी: पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सातत्याने तपासणी करावी लागेल. बिगर-पर्वणीच्या काळात दर सात दिवसांनी, तर गर्दीच्या प्रमुख पर्वणीच्या दिवसांत दररोज पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी करून त्याची नोंद ठेवावी लागेल.
* कचरा व्यवस्थापन: कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण करून, अधिकृत संस्थेमार्फत दररोज कचरा संकलित करावा लागेल. ओल्या कचऱ्यापासून खत किंवा बायोमिथेनेशन प्रक्रियेला प्राधान्य दिले जाईल.
अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा व आपत्कालीन आराखडा
भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, प्रत्येक टेंट सिटीला जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागेल.
* यामध्ये आग, अचानक होणारी गर्दी, वैद्यकीय आणीबाणी आणि हवामानातील बदल यावर उपाययोजनांचा समावेश असेल.
* विद्युत व्यवस्थेसाठी अर्थ-लीकेज सर्किट ब्रेकर (ELCB) बसवणे, सुरक्षित वायरिंग करणे आणि भाविकांना प्रवेश देण्यापूर्वी विद्युत सुरक्षा तपासणी (Electrical Safety Audit) करून घेणे अनिवार्य आहे.
लवकरच सुरू होणार अर्ज प्रक्रिया
खासगी टेंट सिटी उभारणीसाठीची अर्ज प्रक्रिया प्राधिकरण लवकरच सुरू करणार आहे. अर्जासोबत जमिनीची कागदपत्रे, जीपीएस निर्देशांक, नकाशा/आराखडा, तंबूंची संख्या, पाणी-वीज-सांडपाणी व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाय आणि ऑपरेटरचा अनुभव ही माहिती सादर करावी लागेल. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळणे बंधनकारक असेल.
"सिंहस्थ काळातील भाविकांची अथांग गर्दी लक्षात घेऊन नियोजनबद्ध आणि सुरक्षित निवास व्यवस्था निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे शहरातील कायमस्वरूपी सुविधांवर ताण येणार नाही, तसेच खासगी जमीनमालक आणि ऑपरेटर्सना सिंहस्थाच्या या मोठ्या व्यवस्थेत थेट सहभागी होण्याची उत्तम संधी मिळेल." — शेखर सिंह (आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण)