केशव खेडकर, (नाशिक) ३० सप्टेंबर - नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आणि 'पेसा' (PESA) क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के पेसा संवर्गातील ३९ पात्र उमेदवारांना नियमित सेवेत सामावून घेण्याचे आदेश अधिकृतपणे निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटी व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना सेवेत स्थैर्य लाभले आहे.
जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या गुणवत्ता यादीस मान्यता देण्यात आली होती. न्यायालयीन निर्णय तसेच शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
'IBPS' परीक्षेच्या निकालाधारे नियुक्ती; 'S-09' वेतनश्रेणी लागू
ग्राम विकास विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी 'IBPS' मार्फत पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली.
नियमित सेवेत समाविष्ट झालेल्या या ३९ आरोग्य सेवकांना 'एस-०९' (S-09) या अधिकृत वेतनश्रेणीत नियुक्ती देण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवकांची भासणारी चणचण आता दूर होणार आहे.
दुर्गम व आदिवासी उपकेंद्रांना मिळाले नवे आरोग्य सेवक
या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील विविध ३२ हून अधिक महत्त्वाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये पूर्णवेळ आरोग्य सेवक उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने तळेगाव, घोटी, मोहलांगी, मटाणे, पिंप्री अंचला, पळसविहिर, कोचरगाव, खिराड, गांडोळे, नांदगाव सदो, वरखेडा, चणकापूर, उस्थळे, जाऊले, हातगड, राशा, करंजुल, चिंचओहोळ, बेरवळ, वणी, हरसूल, डांगसौदाणे, पिंपळा बु., मोहपाडा, मुलवड, उंबरठाण, सुभाषनगर, खिर्डी, माळीवाडा, तोंडवळ, भिलमाळ आणि नळवाडी या उपकेंद्रांचा समावेश आहे.
आरोग्य यंत्रणेला अधिक बळकटी मिळेल: मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार
या निर्णयाबाबत बोलताना नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार म्हणाले,
"पेसा व आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आणि सातत्यपूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी सक्षम व स्थायी मनुष्यबळ अत्यंत आवश्यक होते. या नियमित नियुक्तीमुळे आरोग्य सेवकांना सेवेत स्थैर्य मिळाले असून ग्रामीण आरोग्य यंत्रणेला मोठी बळकटी मिळणार आहे. सर्व नवन नियुक्त कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करून आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत जबाबदारीने व निष्ठेने सेवा बजावावी."
ही संपूर्ण भरती व नियुक्ती प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल सानप, कनिष्ठ सहाय्यक नंदकुमार पवार, मिलिंद पाने, शीतल घुगे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यशस्वी समन्वयातून पूर्ण करण्यात आली.