दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ३० सप्टेंबर - अवकाळी पाऊस, हवामानातील अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे अशा अनेक संकटांचा सामना करत सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने (एसएफपीसीएल) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ₹२,६०९.२७ कोटींचे एकत्रित उत्पन्न मिळवले आहे. गतवर्षीच्या ₹१,९५४.७३ कोटींच्या तुलनेत ही वाढ ३३.५ टक्के आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे झालेल्या कंपनीच्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे निकाल सभासदांसमोर मांडण्यात आले.
फळउत्पादक शेतकऱ्यांसाठी हे वर्ष विशेष आव्हानात्मक ठरले. महाराष्ट्रात दीर्घकाळ सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष, संत्रावर्गीय फळे आणि टोमॅटो पिकांना मोठा फटका बसला, तर पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक व व्यापार विस्कळीत झाला. अशा परिस्थितीतही मिळालेले हे यश म्हणजे शेतकरी सभासदांच्या कष्टाचे, चिकाटीचे आणि सामूहिक ताकदीचे फळ असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
संकटांवर मात करत सलग १४ वर्षे वाढ
शेतकरी सभासदांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कंपनी या कठीण वर्षातही नफ्यात राहिली. आर्थिक वर्ष २०११-१२ मध्ये केवळ ₹१३ कोटी उत्पन्न मिळवून दमदार सुरवात केली होती. गेली सलग १४ वर्षे कंपनीने दरवर्षी सरासरी ४६ % वाढ नोंदवत आज रू.२६०९ कोटींपर्यंत मजल मारली आहे. गारपीट, दुष्काळ, कोविड-१९ महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष आणि यंदाचा अतिवृष्टीचा फटका — अशा प्रत्येक संकटातही ही वाटचाल थांबली नाही. आपल्या पीकातील प्रश्नांसाठी एकत्रित येणे, विविध बाजारपेठा शोधणे, पायाभूत सुविधांची उभारणी, ताजी फळे, प्रक्रिया, मूल्यवर्धन, तंत्रज्ञानाचा वापर ही धोरणांनी संस्थेला या टप्प्यावर आणले.
विस्तारणारे शेतकरी जाळे
वर्षभरात सह्याद्री फार्म्स ५३,३२२ एकरांवरील ३०,३०२ शेतकऱ्यांशी जोडली गेली आणि ४,४६,३३५ टन शेतमालाची खरेदी केली. ही खरेदी गतवर्षीपेक्षा १७ टक्क्यांनी अधिक आहे. वैयक्तिक सभासदत्व तसेच सभासद शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) माध्यमातून आज २३,४८० शेतकरी कंपनीचे भागधारक आणि सह-मालक आहेत.
‘सीड टू प्लेट’ — एकात्मिक मूल्यसाखळीचा शेतकऱ्यांना आधार
सह्याद्री फार्म्स ‘सीड टू प्लेट’ या एकात्मिक मॉडेलवर काम करते. लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा, पीक सल्ला, नव्या वाणांची माहिती, प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी मदत केली जाते. काढणीनंतर नाशिक आणि नांदेड येथील प्रकल्पांमध्ये शेतमालाची वर्गवारी, प्रतवारी, पॅकिंग, प्रक्रिया आणि साठवणूक केली जाते. तसेच ग्राहकांना सुरक्षित व किफायतशीर दरात आपली उत्पादने पुरवली जातात.
कंपनी आपली ताजी फळे-भाजीपाला आणि मूल्यवर्धित उत्पादने देशात तसेच परदेशात विकते. देशांतर्गत ताज्या फळांच्या व्यवसायाचे उत्पन्न सुमारे ₹४४३ कोटींवरून ₹१,०१४ कोटींवर पोहोचले असून, निर्यात व प्रक्रिया व्यवसायासोबतच देशांतर्गत व्यवसायही अधिक भक्कम झाला आहे. विविध बाजारपेठा उपलब्ध असल्याने एखादी बाजारपेठ अडचणीत आल्यास माल दुसऱ्या बाजारपेठेकडे वळवता येतो आणि काढणीपश्चात नुकसान कमी होते.
बदलत्या हवामानासाठी नवी वाणे
आर्थिक वर्ष २०१५-१६ पासून सह्याद्री फार्म्स आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने द्राक्षाच्या नव्या पेटंटेड वाणांचा विकास व चाचणी करत आहे. जगातील आघाडीच्या वाणसंशोधक संस्थांपैकी एक असलेल्या ग्रापा ग्लोबलसोबत (Grapa Global) कंपनीचा भारतासाठी विशेष करार असून, त्यांची पेटंटेड वाणे भारतात लागवड व विक्रीचे अधिकार सह्याद्रीकडे आहेत. या वाणांनी पारंपरिक वाणांपेक्षा सरस कामगिरी केल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्याकडे कल वाढत आहे. याशिवाय ‘टँगो’ या पेटंटेड संत्रावर्गीय वाणाच्या भारतातील लागवड व विक्रीचा विशेष परवानाही कंपनीकडे असून, या वाणाची सध्या चाचणी सुरू आहे.
ग्रामीण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी
सह्याद्री फार्म्सने २,३५५ महिलांसह ७,२२८ जणांना थेट रोजगार दिला आहे. यापैकी सुमारे ६८ टक्के कर्मचारी नाशिक जिल्ह्यातील २९० गावांमधील आहेत, तर एकूण कर्मचारी महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील ५४० गावांमधून येतात. व्यवस्थापन व कार्यालयीन पदांवरील १,३४२ कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक पदवीधर किंवा त्याहून उच्चशिक्षित असून, त्यात १६७ अभियंत्यांचा समावेश आहे.
महिलांचा भक्कम सहभाग
कंपनीच्या शेतकरी भागधारकांमध्ये महिलांचे प्रमाण ४४.३ टक्के असून, प्रत्येक तीन कर्मचाऱ्यांपैकी एक महिला आहे. संचालक मंडळावर दोन महिला संचालक कार्यरत आहेत, तर कंपनीच्या प्रशिक्षण व क्षमता विकास उपक्रमांमधील सहभागींपैकी ५७ टक्के महिला आहेत.
अध्यक्षांचे मनोगत
सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले,
“हे यश आमच्या शेतकऱ्यांचे आहे. त्यांचे कष्ट, विश्वास आणि ‘एकत्र प्रगती’ करण्याची जिद्द यामुळेच हे शक्य झाले. यंदाचा हंगाम अत्यंत कठीण होता; तरीही आमचे शेतकरी कुटुंब एकजुटीने उभे राहिले आणि सामूहिक प्रयत्नांतून आम्ही समाधानकारक कामगिरी करू शकलो.”
“प्रत्येक संकट टाळता येत नाही, पण त्यासाठीची तयारी आणि लवचिकता नक्कीच वाढवता येते. म्हणूनच आम्ही सुधारित वाणे, पीकविषयक ज्ञान, काढणीपश्चात पायाभूत सुविधा, प्रक्रिया क्षमता, विविध बाजारपेठा आणि सक्षम व्यवस्थापन प्रणालींमध्ये गुंतवणूक केली. भूतकाळात केलेली ही गुंतवणूक आज आमची ताकद बनत आहे.”
“‘Driven by Resilience, Defined by Growth’ — ‘लवचिकतेतून प्रेरणा, विकासातून ओळख’ या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांचे स्थिर उत्पन्न व समृद्धी, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता आणि ग्रामीण भागात अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर आमचा भर कायम राहील.”
ठळक मुद्दे — आर्थिक वर्ष २०२५-२६
* एकूण उत्पन्न: ₹२,६०९.२७ कोटी, गतवर्षीच्या तुलनेत ३३.५ टक्के वाढ; एबिटा (EBITDA) ₹२५८ कोटी, करोत्तर निव्वळ नफा ₹५५.१८ कोटी.
* शेतकरी जाळे: ५३,३२२ एकरांवरील ३०,३०२ शेतकऱ्यांशी जोडणी; ४,४६,३३५ टन शेतमालाची खरेदी, गतवर्षीपेक्षा १७ टक्के अधिक.
* रोजगार: २,३५५ महिलांसह ७,२२८ जणांना थेट रोजगार; त्यापैकी ६८ टक्के कर्मचारी नाशिक जिल्ह्यातील.
* सलग वाढ: २०११-१२ मधील ₹१३ कोटींवरून सलग १४ वर्षे वाढ; वार्षिक चक्रवाढ दर (CAGR) ४६ टक्के.
सह्याद्री फार्म्सविषयी
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही भारतातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या सर्वांत मोठ्या फलोत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना २०११ मध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली. द्राक्ष, टोमॅटो, संत्रावर्गीय फळे, केळी, आंबा, डाळिंब, स्वीट कॉर्न आणि काजू या पिकांमध्ये कंपनी कार्यरत असून, तिची ताजी व प्रक्रिया केलेली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत विकली जातात आणि ४५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात.