तमिळनाडूत निर्मिती, १३०० किमी प्रवास अन् महाराष्ट्रात जुळणी... बुलेट ट्रेनसाठी साकारला पहिला पोलादी पूल...

Share:
Main Image
Last updated: 29-Sep-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) २९ सप्टेंबर - देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर अंतर्गत महाराष्ट्रात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दिवे-अंजूर गावात राष्ट्रीय महामार्ग-३ (नाशिक महामार्ग) वर १,४०५ मेट्रिक टन वजनाचा आणि १०० मीटर लांबीचा भव्य पोलादी पूल (Steel Bridge) यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला हा पहिलाच पोलादी पूल ठरला आहे.

तमिळनाडूत निर्मिती, १३०० किमी प्रवास अन् महाराष्ट्रात जुळणी

या पुलाचे सर्वात मोठे तांत्रिक वैशिष्ट्य म्हणजे याची रचना प्रत्यक्ष उभारणीच्या ठिकाणापासून तब्बल १,३०० किलोमीटर दूर असलेल्या त्रिची (तमिळनाडू) येथील कारखान्यात तयार करण्यात आली. तेथून ट्रेलर्सच्या माध्यमातून हे अवजड घटक महाराष्ट्रात आणले गेले आणि घटनास्थळी त्यांची अचूक जुळणी करण्यात आली. ही कामगिरी देशातील जटिल पायाभूत सुविधांची निर्मिती, वाहतूक आणि नियोजनातील 'मेक इन इंडिया'च्या वाढत्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.

तांत्रिक वैशिष्ट्ये आणि भव्यता:

 * आकार आणि वजन: या पुलाची लांबी १०० मीटर, रुंदी १४ मीटर आणि उंची १४ मीटर असून मुख्य पुलाचे वजन १,४०५ मेट्रिक टन आहे.

 * उंची आणि जोडणी: जमिनीपासून तब्बल १७.५ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर या पुलाची जुळणी करण्यात आली. यासाठी ५४,०७६ हाय-स्ट्रेंथ बोल्ट्स (TTHSB) वापरण्यात आले.

Advertisement

 * सुरक्षा अन् गुणवत्ता: वापरण्यात आलेल्या पोलादाच्या प्रत्येक बॅचची 'अल्ट्रासोनिक चाचणी' करण्यात आली. वेल्डर आणि पर्यवेक्षकांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रमाणित करण्यात आले होते.

 * दीर्घायुष्य: पुलाचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी 'C5 प्रोटाक्टिव्ह पेंटिंग' आणि कंपने नियंत्रित करण्यासाठी 'इलास्टोमेरिक बेअरिंग्ज' बसवण्यात आले आहेत.

रात्रीच्या ट्रॅफिक ब्लॉकमध्ये ऑटोमॅटिक लाँचिंग

महामार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा न पोहोचवता हा भव्य पूल स्थापित करणे मोठे आव्हान होते. प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन हॉलो जॅक आणि स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून पूल सरकवून स्थापित करण्यात आला. महामार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम रात्रीच्या वेळी विशेष 'ट्रॅफिक ब्लॉक' दरम्यान अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्यात आले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी एकूण २८ पोलादी पुलांचे नियोजन असून, त्यापैकी आतापर्यंत १६ पुलांचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

 

Comments

No comments yet.