पुणे, (प्रतिनिधी) २९ सप्टेंबर - अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चाकण आणि हिंजवडी या औद्योगिक व आयटी हबमधील वाहतूक कोंडी, रस्ते, पावसाळी पाणी निचरा आणि नागरी सुविधांच्या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत चाकण आणि हिंजवडीच्या एकात्मिक पायाभूत विकासासाठी एकूण रु. १८४६ कोटींच्या निधी आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
यामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रासाठी रु. १४०० कोटी आणि हिंजवडी आयटी पार्कसाठी रु. ४२६ कोटींच्या स्वतंत्र निधीचा समावेश आहे. डिसेंबरपासून या सर्व प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पुढील पावसाळ्यापूर्वी नागरिकांना आणि औद्योगिक क्षेत्राला याचा प्रत्यक्ष दिलासा देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
चाकणचा कायापालट: पावसाळी पाणी निचरा व रस्त्यांचा विकास
चाकण औद्योगिक परिसरात दर पावसाळ्यात पाणी साचून कंपन्यांचे कामकाज ठप्प होणे आणि वाहतूक विस्कळित होणे ही मोठी समस्या बनली होती. सिंचन विभागाच्या सर्वेक्षणानुसार परिसरातील ७८ किमी नैसर्गिक नाल्यांपैकी ७० ते ८० टक्के अतिक्रमणे हटवण्यात आली असून, उर्वरित अडथळे दूर करून जून २०२७ पर्यंत नाले पूर्णपणे मोकळे केले जातील. तसेच रस्त्यालगत ३८ किमी लांबीची नवी पावसाळी गटार व्यवस्था उभारली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात चाकणमधील ४९८ किमी रस्त्यांच्या जाळ्यापैकी ७५ किमी रस्त्यांची प्राधान्याने सुधारणा केली जाईल. यात अतिरिक्त भूसंपादन न करता उपलब्ध जागेचा योग्य वापर करून पादचारी मार्ग, वाहतूक सुरक्षा आणि सेवा वाहिन्यांसाठी (Utility Ducts) स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाईल.
वाहतूक कोंडीवर 'स्मार्ट' उपाय आणि ५०० अतिरिक्त सामायिक बस
चाकण व पिंपरी-चिंचवड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो कामगारांमुळे रस्त्यांवर खासगी वाहनांची प्रचंड गर्दी होते. ही कोंडी कमी करण्यासाठी ५०० अतिरिक्त बस चालवण्याचे नियोजन आहे. याशिवाय परिसरातील ६ प्रमुख चौकांची शास्त्रीय पुनर्रचना केली जाईल.
वाहतूक शिस्त आणि सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS), AI सिग्नल, कॅमेरे, रडार आणि मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (Command & Control Center) उभारला जाईल. वाहतूक नियंत्रणासाठी १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान तैनात केले जात आहेत.
वीज, पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनाचे नियोजन
वीजपुरवठा: एमआयडीसीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर १०० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल.
पाणीपुरवठा: सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत चालवली जाणारी पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (MGP) सोपवून २०२७ पर्यंत पूर्ण केली जाईल.
घनकचरा व्यवस्थापन: १४ गावे आणि २ नगर परिषदांसाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र उभारले जाईल. पुढील ८ ते १० महिन्यांत ही यंत्रणा कार्यरत होईल.
पारकिंग व सुशोभीकरण: अवजड वाहनांसाठी एमआयडीसीने ५ ठिकाणी पार्किंग उपलब्ध केले असून, खासगी भागीदारांच्या (CSR) मदतीने दुभाजकांचे सुशोभीकरण, बसथांबे आणि सार्वजनिक शौचालये उभारली जातील.
हिंजवडीसाठी रु. ४२६ कोटींचा विशेष आराखडा
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी रु. ४२६ कोटींचा स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
वाहतूक व सुरक्षा: हिंजवडीसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून दिले जात आहेत.
वीज व कचरा व्यवस्थापन: वीज यंत्रणेच्या सुधारणेसाठी ६ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून नियमित संकलन सुरू केले जाईल.
समान्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश
एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि महापालिकांनी आपापसातील निधी व यंत्रणांचा समन्वय साधून ही कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या निर्णयामुळे चाकण व हिंजवडीतील उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.