शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची तातडीने बैठक... हे झाले मोठे निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 29-Sep-2026

 

अक्षय काळे, (मुंबई) २९ सप्टेंबर - "पक्ष फोडला तरीही आपल्या पक्षात एक वेगळाच जिवंतपणा आणि सहकाऱ्यांमध्ये लढण्याची मोठी उर्मी आहे. आज पक्षाच्या बैठकीतील गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपला पक्ष नाही, तर सत्ताधारीच अडचणीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे," असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदाधिकारी बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी राज्यातील ज्वलंत प्रश्न, दुष्काळी परिस्थिती, बेरोजगारी आणि पक्षाच्या आगामी धोरणांवर सविस्तर भाष्य केले.

आमदार-खासदार देणार एका महिन्याचा पगार; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीर

राज्यापुढील गंभीर प्रश्नांवर चिंता व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आज राज्यात पाण्याचा तीव्र तुटवडा असून पुढील वर्षभर जगायचे कसे, हा जनतेसमोर मोठा प्रश्न आहे. आमदार रोहित पवार यांनी दुष्काळ आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'एसआयआर' (SIR) मुद्द्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सरकार विशेष अधिवेशन घेईल की नाही हे माहीत नाही, परंतु आपल्या पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार दुष्काळ निवारणासाठी आपल्या एका महिन्याचा पगार देणार आहेत." तसेच पक्षपातळीवरही बाधितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

"रोहित पवार घरी कमी अन् आंदोलनात जास्त!"

आजचे सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी आपल्या नेत्यांच्या मैदानावरील संघर्षाचे कौतुक केले. "आज आपले नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत आहेत. रोहित पवार तर घरी कमी आणि आंदोलन स्थळावरच जास्त असतात," असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेचे कौतुक केले.

Advertisement

रस्त्यांच्या दुर्दशेने गुंतवणूक आणि नोकऱ्या धोक्यात

महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेताना त्यांनी बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले:

 * आयटी पार्कचा विस्तार: बारामती मतदारसंघातील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये आज ६ लाख तरुण काम करत आहेत.

 * चाकणमधील भीषण स्थिती: दुसरीकडे शिरूर मतदारसंघातील चाकण परिसरात रस्त्यांच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे नवे उद्योग आणि गुंतवणूक येण्यास घाबरत आहेत. गुंतवणूक आली तरच नोकऱ्या निर्माण होतात, मात्र सध्याच्या धोरणांमुळे नोकऱ्या कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

"लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मंथन करा"

दुष्काळ, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार आणि एसआयआर यांसारख्या मुद्द्यांकडे पाहिल्यानंतर देशात आणि राज्यात नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न पडतो. निवडणुकांना अजून दोन-तीन वर्षांचा कालावधी असला, तरी जनता अत्यंत अपेक्षेने आपल्या पक्षाकडे पाहत आहे. त्यामुळे या सर्व विषयांवर सखोल मंथन करून पक्षाने आपले धोरण स्पष्ट करावे आणि ठोस पर्यायासह लोकांमध्ये जावे, असा संदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला.

 

Comments

No comments yet.